कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी के. पी.पाटील

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

जिल्हा निबंधकांनी बाजार समिती कारभाराची तीन सदस्यांकडून चौकशी केली

कोल्हापूर :  जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आज जाहीर झाले. यात माजी आमदार के. पी. पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. 
मंडळात सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेची शहानिशा करून नियुक्ती करावी, असे आदेश कार्यसन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीने जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.  बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकताचा राजीनामा दिला. त्यानंतर येथे जिल्हा निबंधकांनी प्रशासक म्हणून प्रदीप मालगावे यांची निवड केली होती. त्यांनी प्रशासक म्हणून चार दिवस बाजार समितीचा कारभारही पाहिला आहे. अशातच समितीवर अशासकीय नियुक्ती केल्याची माहिती जिल्हास्तरावर आली आहे.

हेही वाचा- बाळ जन्मले पण आईचा मृत्यू झाला अन् त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली पण... -

नव नियुक्त अशासकीय प्रशासक मंडळात के. पी. पाटील मुख्य प्रशासक (मुदाळ, ता. भुदरगड), प्रा. जालंदर पाटील (राशिवडे, ता. राधानगरी), बी. एच. पाटील (वडणगे, ता. करवीर), सचिन घोरपडे (वाघापूर, ता. भुदरगड), करणसिंह गायकवाड (सुपात्रे, ता. शाहूवाडी), कल्याणराव निकम (वसरेवाडी, ता. भुदरगड), सूर्यकांत पाटील (बामणी, ता. कागल), राजेंद्र पाटील (सोळांकूर, ता. राधानगरी), दिगंबर पाटील (दिंडर्नेली, ता. करवीर), अजित पाटील (माले, ता. करवीर), अजित पाटील (परिते, ता. करवीर), सुजाता सावडकर (अणूर, ता. कागल), दगडू भास्कर (रा. कुडित्रे, ता. करवीर) यांचा समावेश आहे. 

हेही वाचा- शाहू कारखान्याचा हा आहे नावीन्यपूर्ण उपक्रम -

राजकीय घडामोडीनंतर...
कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकर भरती, जागा हस्तांतरणासह अन्य काही विषयांवर जिल्हा निबंधक, तसेच पणन संचालकांकडे गेल्या महिन्याभरात तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा निबंधकांनी बाजार समिती कारभाराची तीन सदस्यांकडून चौकशी केली होती. संबंधित समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून श्री. मालगावे यांची नियुक्ती झाली. याच वेळी काही राजकीय घडामोडीही झाल्या. यातून बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ जाहीर झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: k p patil Chief Administrator of Kolhapur Agricultural Produce Market Committee. P. Patil