पुन्हा आगळीक; सहकार विभागाकडूनही आता कन्नडसक्ती ; सीमाभागातून संताप 

महेश काशीद 
Tuesday, 18 August 2020

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची कोंडी होऊ लागली आहे. 

बेळगाव - सहकार निबंधक विभागातर्फे संघ-संस्था आणि बिगरसेवाभावी संस्थांच्या नोंदणीसाठी कन्नडसक्ती केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, उच्चशिक्षण, वाहतूक, आरोग्य आणि परवाना देण्यासाठी कन्नडची सक्ती केली आहे. त्यामध्ये आता सहकार निबंधक कार्यालयाची भर पडली आहे. यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची कोंडी होऊ लागली आहे. 

संघ नोंदणीसाठी तपशिल (बायलॉग) मराठी व इंग्रजीत स्वीकारला जात नाही. कन्नडमध्येच तपशील दिल्यास अर्ज स्वीकारले जात आहेत. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे. तरीही विरोध झुगारून कन्नडची सक्ती सुरु आहे. बिगर सेवाभावी संस्था (एनजीओ), संघ किंवा युवा संघटनेच्या नोंदणीसाठी सहकार निबंधकांकडे अर्ज करावा लागतो. त्याठिकाणी यापूर्वी कोणत्याही भाषेत अर्ज अणि बायलॉग स्वीकारले जात होते. मात्र, अलीकडे कन्नडसक्ती केली जात आहे. त्यामुळे तपशील कन्नडमध्ये देण्याचा आदेश बजावला असून कन्नडेत्तर भाषिकांची अडचण वाढली आहे. परिणामी, अर्जासह दाखले सादर करताना समस्या उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्याला आक्षेप घेतल्यास नोंदणी होणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. 

दरम्यान, काही संघटनांनी कन्नडला आक्षेप घेतल्यास त्यांना कन्नडसह इंग्रजीचा पर्याय दिला जात आहे. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे. कागदपत्रे, दाखले मराठीतही देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे; पण त्याची कार्यवाही न करता उलट कन्नडसक्ती केली जात आहे. मराठी, इंग्रजीतील तपशील आणि अर्ज स्वीकारण्यास नकार देऊन मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सीमाभागातून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. 

हे पण वाचानात्याला काळीमा : स्वत:च्या पत्नीलाच मित्रासोबत जबरदस्तीने ठेवायला लावले शारीरिक संबंध

 

शहापूरमधील एका युवक संघटनेच्या नोंदणीसाठी सहकार निबंधक कार्यालयात गेलो होतो. तेथे कन्नडमधून तपशील (बायलॉज) देण्याबाबत सूचना केली. शिवाय अर्ज केल्यानंतर ते स्वीकारण्यात येणार नाही, अशी माहिती दिली. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. तरीही कन्नडची सक्ती करून मराठीसह अन्य भाषिकांची कोंडी केली जात आहे. 

-ऍड. महेश बिर्जे 

संघ, संस्थांसह संघटनांची नोंदणी करताना तपशील कन्नडमध्ये सादर करणे आवश्‍यक आहे. शासनाचा तसा आदेश आहे. मात्र, कन्नडसह इंग्रजीमध्ये संघाची नोंदणी करता येईल. परंतु, केवळ इंग्रजीत संघाची नोंदणी करता येणार नाही. 

-के. एल. नरसिंहमूर्ती, सहकार निबंधक, बेळगाव
   
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kannada compulsory from karnataka Cooperation Department