esakal | 'ती' टोळधाड कर्नाटकच्या उंबरठ्यावर, कृषी विभाग झालंय सज्ज...
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka agriculture department awareness campaign for farmer

गेले काही दिवस समाजमाध्यमांवर या टोळधाडीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण त्याबाबत कर्नाटकच्या कृषी खात्याने गांभीर्य दाखविले नव्हते.

'ती' टोळधाड कर्नाटकच्या उंबरठ्यावर, कृषी विभाग झालंय सज्ज...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्यात येऊन धडकलेल्या टोळधाडीचा धसका कर्नाटकानेही घेतला आहे. राज्याच्या कृषी खात्याने या संदर्भात बेळगावसह महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यात जागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी दवंडी पिटवून या टोळधाडीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शिवाय या टोळधाडीवर प्रभावी ठरणाऱ्या कीटक नियंत्रकाची उपलब्धता सर्व रयत केंद्रात करून देण्यात आली आहे. कृषी खात्याचे बेळगावचे सहसंचालक श्री मोकाशी यांनी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

टोळधाड कर्नाटकात येऊ शकते

गेले काही दिवस समाजमाध्यमांवर या टोळधाडीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण त्याबाबत कर्नाटकच्या कृषी खात्याने गांभीर्य दाखविले नव्हते. पण महाराष्ट्रात ही टोळधाड पोचल्यामुळे कर्नाटक सरकारने कृषी खात्याला सज्ज राहण्याची सूचना दिली आहे. सहसंचालक मोकाशी यांच्या मते सीमावर्ती भागातील रायचूर, गुलबर्गा, बिदर जिल्ह्यातून ही टोळधाड कर्नाटकात येऊ शकते असे कृषी खात्याला वाटते.

वाचा - गोष्ट पारुबाईची; करेवाडीच्या माणुसकीची !

त्यामुळेच खबरदारी घेण्यास व उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. टोळधाड रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी खात्याने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती कर्नाटकाकडून घेतली जात आहे. त्यानुसार गरज भासल्यास आणखी औषधांचा पुरवठा रयत संपर्क केंद्राना केला जाणार आहे. सध्या कर्नाटकात व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. ऊस पीक शेतात आहे, अपवाद वगळता अन्य पिके नाहीत. पण टोळधाडीमुळे कोणत्याही पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. शेतात मोठ्याने वाद्यांचे आवाज काढले तरी ही धाड अन्यत्र जाऊ शकते. शिवाय औषध फवारणी करूनही प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे दवंडी पिटवून शेतकऱ्यांना या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना नंतर आता हे नवे संकट कर्नाटक राज्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. यामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.
 

go to top