
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती; श्रेष्ठींची सहमती घेणार
बंगळूर : कर्नाटक सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आर.आर. नगर आणि शिरा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीनंतर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुक्रवारी दिली. शिरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी आपल्या अधिकृत कावेरी निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यातील पोटनिवडणुकीनंतर मी दिल्लीला जाणार आहे. त्यादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय अंतिम होईल. दिल्लीला कधी जायचे यावर निर्णय झाला नाही, परंतु पोटनिवडणुकीनंतर दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर हायकमांडशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. मागील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता, परंतु पोटनिवडणूक जाहीर झाल्याने हा विषय मागे पडल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येत्या १५-२० दिवसांत मुख्यमंत्री बदलला जाईल, अशा केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले की, पोटनिवडणुकीनंतर धजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केले जातील, राज्यसरकारच्या नेतृत्वात नाही. प्रचाराच्या मुद्यावर ते म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी पोटनिवडणुकीत प्रचार केला. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीसाठी मी प्रचार केला नसता, तर ते चुकीचे झाले असते.
हेही वाचा- सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणखी एक महिना राहणार बंद -
चार-पाच मंत्र्यांना वगळणार
सप्टेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची योजना होती. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिल्लीला जाऊन या संदर्भात पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चाही केली होती. परंतु भाजप हायकमांडने अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सुचवून वेळ मारून नेली. त्यानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली. मंत्रिमंडळात सध्या सहा जागा रिक्त असून मुख्यमंत्र्यांना चार जागा भरायच्या आहेत. जर वरिष्ठांनी मंत्रिमंडळातील फेरबदलास मान्यता दिली तर ४-५ मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे आणि नवीन आमदारांचा समावेश होईल.
संपादन - अर्चना बनगे