कर्नाटकने माणुसकी हरवली, महाराष्ट्राने जपली 

कर्नाटकने माणुसकी हरवली, महाराष्ट्राने जपली 

कागल : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीपोटी अनेक मजूर, कामगार, नोकरदार आपआपल्या गावी परतू लागले आहेत. विविध राज्यांच्या शासनाने या लोकांसाठी येण्या-जाण्यासाठी ई-पासची सोय केली आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी किंवा महाराष्ट्रातून जाण्यासाठी ई-पास आवश्‍यक केला आहे. हे करत असताना अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे तर काही ठिकाणी माणुसकी मृत झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये जरी वेगळी असली तरी दोघांच्या भूमिका वेगळ्या व भिन्न स्वरूपाच्या असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील काही लोक पुणे, मुंबईत आहेत. ते आपल्या राज्यात परत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नागरिक कर्नाटकच्या सीमेवर आल्यावर त्यांना प्रवेशन देता परत पाठवण्याचे काम कर्नाटक पोलिस करत आहेत. याउलट कर्नाटक राज्यातून असलेले महाराष्ट्रात येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्रिय असल्याचे दिसून येते. या दोन राज्यांमध्ये "माणुसकी' कर्नाटकने हरवली व महाराष्ट्राने जपली असेही चित्र आहे. 

कागलजवळ दूधगंगा नदीच्या पुलाच्या थोडेसे पुढील बाजूस कर्नाटक पोलिसांचा तपासणी नाका आहे. कर्नाटक पोलिसांनी आजअखेर पाच मृतदेह परत महाराष्ट्रात पाठवले आहेत. कर्नाटकात प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या नागरिकांना प्रवेश मिळत नाही. या ठिकाणी थांबून कंटाळून दोन-तीन दिवसानंतर पुन्हा माघारी पुणे, मुंबईकडे परतत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या अठरा ते वीस वयाच्या दहा मुली तीन दिवस थांबून परत फिरल्या. नवी मुंबईतून अकरा बसेसमधून आलेले 247 प्रवासी परत गेले. 

आता महाराष्ट्रातून केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या नागरिकांची अडवणूक सुरू आहे. मुंबईहून केरळकडे जाणाऱ्या बसला प्रवेश नाकारण्यात आला आहे. लहान मुले, महिलांचा समावेश असलेली बस कर्नाटक प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहे. 

सीमेवर अडकून पडलेल्या लोकांना कागल पोलिसांचा आधार आहे. या लोकांना चहापान व जेवण देण्यातून माणुसकी जपण्याचे काम महाराष्ट्र पोलिसांकडून केले जात आहे. यासाठी व्हाईट आर्मी, कणेरी मठ व बैतुलमाल कमिटीचे सहकार्य लाभत आहे. व्हाईट आर्मीने आजअखेर दोन हजार लोकांची जेवण दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

या उलट कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आज अखेर सुमारे 40 बसेसमधून हजार ते बाराशे नागरिकांना पाठविण्यात आले. रायगड, पालघर, गोंदिया, नागपूर, उस्मानाबाद, सातारा, या ठिकाणी या नागरिकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोच करण्याचे कामही कागलच्या महसूल विभागाने व कागलच्या पोलिसांनी पार पाडत माणुसकीचे दर्शन घडवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com