
28 डिसेंबर 2020 ला कन्नडिगांनी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज फडकवला
कागल : बेळगाव पालिकेच्या प्रांगणात लावलेला लाल पिवळा ध्वज हटवणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच भगवा ध्वज फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर रोखले. कर्नाटक पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी करत शिवसैनिकांना धक्काबुक्की केली.
28 डिसेंबर 2020 ला कन्नडिगांनी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर लाल पिवळा ध्वज फडकवला. त्यामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. याच्या निषेधार्थ कोल्हापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहनही केले होते. हा बेकायदा लावलेला ध्वज 21 जानेवारीच्या आत हटवावा, अन्यथा ध्वज काढण्यासाठी विराट मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेकडून दिला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासूनच कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली. याची कुणकुण लागताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, सुनील शिंदे, संग्राम कुपेकर यांच्यासह कार्यकर्ते आदल्या दिवशीच बेळगावकडे रवाना झाले होते; मात्र या सर्वांना शिनोळी येथे रोखले.
हे पण वाचा - महावितरणचे दोन कंत्राटी शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात
आज सकाळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आदी शिवसैनिकांना लिंगनूर कापशीमार्गे अर्जुननगरजवळ रोखले. त्यानंतर या सर्वांनी आपला मोर्चा महामार्गावरील कोगनोळीकडे वळविला. मात्र कोगनोळीजवळही कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र त्यांना कर्नाटकात सोडले नाही.
संपादन - धनाजी सुर्वे