महावितरणचे दोन कंत्राटी शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात 

राजेश मोरे 
Thursday, 21 January 2021

ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाबाहेर ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले

कोल्हापूर - पेन्शनचा प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यासाठी पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून ती घेतल्या प्रकरणी महावितरणचे दोन कंत्राटी शिपाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. चंद्रकांत ऊर्फ बाळू सात्ताप्पा मांढरेकर (वय 36, रा. केनवडे ता. कागल) आणि सुनील यशवंत हजारे (वय 30, रा. हुन्नुर ता. कागल) अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाबाहेर ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले. 

ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयात संशयित चंद्रकांत ऊप्फ बाळू मांढरेकर व सुनील हजारे हे दोघे कंत्राटी शिपाई म्हणून काम करतात. तक्रारदारांचे वडील महावितरणमधून 2010 मध्ये निवृत्त झाले. पण त्यांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर 2020 ला कार्यालयात सादर केला. त्यांनी काही दिवसांनी याबाबतची चौकशी केली. त्यांना हा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ कार्यालयात मंजुरीला पाठविला असून त्याचा मोबदला म्हणून संशयितांनी पाचशे रुपये लाचेची मागणी केली. याची तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. विभागाने आज दुपारी महावितरण कार्यालयाबाहेर सापळा लावला. तक्रादरांकडून पाचशे रुपयांची लाच घेताना संशयित चंद्रकांत मांढरेकरला रंगेहात पकडले. याप्रकरणी मांढरेकरसह व हजारे या दोघांवर कारवाई केल्याचे बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई बुधवंत यांच्यासह सहायक फौजदार शाम बुचडे, कर्मचारी अजय चव्हाण, सूरज अपराध, कृष्णात पाटील, मयूर देसाई, संदीप पडवळ, रूपेश माने यांनी केली. 

हे पण वाचा रस्त्यावरील चुकीला माफी नाही

नवीन वर्षातील दुसरी कारवाई 
लाचलुचपत विभागाने नवीन वर्षात केलेली ही दुसरी कारवाई आहे. गेल्या वर्षभरात महावितरण विभागावर केलेली ही तिसरी कारवाई असल्याचे बुधवंत यांनी सांगितले. 

 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two contract workers of MSEDCL arrested taking bribe kolhapur