नवरात्रोत्सव : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अशी असणार नऊ दिवस नऊ रूपांतील उत्सवकाळातील पूजा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर उत्सवकाळात भाविकांसाठी बंदच असले, तरी सर्व धार्मिक विधी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत.

कोल्हापूर : घटस्थापनेने उद्या (ता. १७) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर उत्सवकाळात भाविकांसाठी बंदच असले, तरी सर्व धार्मिक विधी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. नऊ दिवस नऊ रूपांतील विविध सालंकृत पूजा बांधल्या जाणार असून, त्याची माहिती आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्‍वर यांनी दिली.

 शनिवारी (ता. १७) : कुण्डलिनीस्वरूपा रूपातील पूजा ः जिचा रंग उगवत्या सूर्याप्रमाणे आहे, जिचे तीन नेत्र आहेत, जिच्या मुकुटावर माणिक आहेत आणि जिचे मस्तक चंद्रकोरीने सुशोभित आहे, जिने लाल कमळ धारण केले आहे, जी सौम्य आहे, रत्नांनी भरलेल्या घड्यावर जिचे पाय विराजमान आहेत, अशा पराम्बिकेचे ध्यान करावे, असे या पूजेचे माहात्म्य आहे.

 रविवारी (ता. १८) :  पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक ः श्री अंबाबाई जेव्हा महाविष्णूस्वरूपात पराशरांना दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय फिटतो व ते अंबाबाईला विष्णुस्वरूपिनी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने स्तुती करतात.

 सोमवारी (ता. १९) : नागकृत महालक्ष्मी स्तवन ः पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होऊ लागते. त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात; परंतु शेवटी शापभयाने
नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात, तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन तिलाच विचारण्यास सांगतात. तेव्हा नागलोक अंबाबाईचे दर्शन घेऊन तिची स्तुती करतात.

 मंगळवारी (ता. २०) : सनतकुमारांनी सांगितलेले महालक्ष्मी सहस्रनाम ः मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेले श्री अंबाबाईचे सहस्रनाम उद्‌धृत केले आहे. सनतकुमार योगिजनांना श्री अंबाबाईची हजार नावे सांगतात आणि तिची स्तुती करतात.

हेही वाचा- कासा आज्जीला जिद्दीला सलाम : लाडूमुळे मिळाला चर्मकार समाजाला व्यवसाय -

 बुधवारी (ता. २१) :ललिता पंचमी ः गजारूढ अंबारीतील पूजा.

 गुरुवारी (ता. २२) : श्री शिवकृत महालक्ष्मीस्तुती ः करवीर क्षेत्रात असलेले दशाश्‍वमेध तीर्थ व त्याचे महत्त्व श्री शिव मुडानीला सांगतात व उमेसह करवीर क्षेत्री राहण्यासाठी क्षेत्र देवतेची म्हणजेच श्री अंबाबाईची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा अंबाबाई श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व तेथील प्रत्येक जीवासअंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. तोच ईशान सध्या अंबाबाई मंदिराच्या उजव्या बाजूचा काशीविश्‍वेश्‍वर. त्याच्यासमोर काशीकुंडही आहे.

 शुक्रवारी (ता. २३) :अगस्त्यकृत सरस्वती स्तवन ः अगस्ती मुनी जेव्हा पत्नीसह करवीरस्थ त्रिशक्तीचे म्हणजेच श्री महाकाली, श्री अंबाबाई आणि श्री महासरस्वती यांचे दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या तोंडून त्रयीमूर्तींची स्तुती-स्तोत्रे बाहेर पडतात. त्या स्तवनापैकीच हे एक महासरस्वतीचे स्तवन

 शनिवारी (ता. २४) : अष्टमी ः महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा

 रविवारी (ता. २५) : दसरा ः अश्‍वारूढ पूजा 

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karveernivasini Shri Ambabai navratr festival For nine days various ornate pooja in nine forms will be performed