कोल्हापुरात दोन लहान मुलांच्या अपहरण नाट्याचा थरार ; मुले सापडल्यानंतर आली 'ही' माहिती पुढे 

राजेश मोरे
बुधवार, 15 जुलै 2020

हा प्रकार समजताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि संबंधित अपहरणकर्त्यांचा शोध सुरू झाला.

कोल्हापूर - सदर बाजार चौकात खेळत असणाऱ्या दोन सख्ख्या भावांना एका गाडीतून महिलेने पळवून नेहल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मुलांच्या आजीसह नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी रिक्षातून संबंधित मोटारीचा पाठलाग सुरू केला. पण ती मोटर मार्केट यार्डच्या दिशेने दिसेनाशी झाली. तसा नातेवाईकांनी थेट पोलिस ठाणे गाठले. हा प्रकार समजताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि संबंधित अपहरणकर्त्यांचा शोध सुरू झाला.

याबाबत अधित माहिती अशी, सदर बाजार परिसरात लहानपणापासून दोन नातवंडे आजीकडे राहतात. पाच वर्षापासून त्या मुलांची आई विभक्त राहते. वडिलांचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आजीने आपल्या खांद्यावर उचलली. आज सकाळी ही दोन भावंडे चौकात खेळत होती. त्याच वेळेला चौकात एक मोटार आली. त्यामध्ये एक महिला व चालक होता. महिला गाडीतून खाली उतरली. तिने खेळणाऱ्या मुलांपैकी या दोन सख्या भावंडांना जबरदस्तीने गाडीत बसवले. हा प्रकार परिसरातील एका महिलेने पाहिला. तिने आरडाओरडा केला. तोपर्यंत तेथून ती मोटार निसटली. संबंधित नातवंडांची आजी व नातेवाइकांनी रिक्षाने त्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. पण मोटार चालकाने त्यांना चकवा दिला. तशी त्यांची आजी व नातेवाईक घाबरून गेले. त्यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. हा प्रकार समजताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मोटारीचा शोध सुरू केला. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर नाकाबंदी करण्यात आली. सीसीटीव्हीच्या आधारे ही मोटार हातकणंगले येथे पोलिसांना मिळाली. तसा पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. संबंधित मुलांच्या आईने दोन्ही मुलांना नेल्याची चर्चा पोलीस ठाण्यात परिसरात सुरू होती.

हे पण वाचा - 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of two children in Kolhapur