खबरदारीचे नियम पाळून केएमटी सेवा सुरू हवी

खबरदारीचे नियम पाळून केएमटी सेवा सुरू हवी

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची (केएमटी) सेवा लॉकडाउनच्या काळात बंद असल्याने अनेकांना आठ ते दहा मैल पायपीट करावी लागत आहे.

लॉकडाउन चारमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता आल्यानंतर इतर व्यापार, व्यवसाय सुरू झाले, पण केएमटी बस सेवा बंद आहे. 31 मेनंतर लॉकडाउनमध्ये आणखी शिथिलता येणार आहे. त्यांनतर मात्र गेली दोन महिने विसावलेली केएमटी बसची चाके कोरोनाच्या खबरदारीचे पालन करत आणि नियम पाळत पुन्हा शहरवासीयांच्या सेवेसाठी गती घेण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या परिवहन विभागाकडे 129 बसेस आहेत. शहर, उपनगरे आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील प्रवाशांची ये-जा या बसमधून केली जाते. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले, कामगारांच्यादृष्टीने सुरक्षित प्रवास म्हणून केएमटीकडे पाहिले जाते. चालक, वाहक आणि इतर कर्मचारी मिळून सुमारे 800 लोकांचा स्टाफ केएमटीकडे आहे. 129 बसची संख्या आहे. सुमारे 75 हजार ते एक लाख इतके प्रवासी दररोज बसने प्रवास करतात. यात काही वर्षांत प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, पण गोरगरिबांना हक्काची सेवा देणारे साधन म्हणून केएमटीकडे पाहिले जाते. दररोज साधारण आठ ते साडेआठ लाख केएमटीचा महसूल असतो. दररोज सुमारे दोन लाख इतका तोटा सहन करत केएमटीची ही सेवा अविरत सुरू असते.  कोरोनाचा फैलाव देशात व्हायला सुरवात झाल्यानंतर केंद्र सरकारने 24 मार्चनंतर लॉकडाउन जाहीर केले. अडीच महिने लॉकडाउन आहे. 


सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय, कार्यालये, शाळा, महाविद्यालये व्यवहार ठप्पच होते. कोल्हापूर ऑरेंज झोनमध्ये असल्याने लॉकडाउन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता प्राप्त झाली. परिणामी ठप्प असलेले, व्यापार, उद्योगधंदे यात 50 टक्के का होईना सुरवात झाली. शहराअंतर्गत ये-जा करण्याची सेवा देणारी केएमटी अजूनही बंदच आहे. दुचाकी नाही, रिक्षा, वडाप परवडत नाही. त्यामुळे अनेक मोलमजुरी करणाऱ्यांना, कामगारांना, हातावरचे पोट असणाऱ्यांना त्याचा फटका बसला असून, पायी जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नोकरी, कामधंद्यासाठी जावेतर लागतेच, हातावरचे पोट असल्याने त्यात खंड पाडून चालत नाही. त्यामुळे आता दररोज सहा ते सात मैल चालत जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

दृष्टिक्षेपात केएमटी 
* एकूण बसेस- 129 
* चालक, वाहक अन्य एकूण कर्मचारी -800 
* रोजचे प्रवासी - 75 हजार ते 1 लाख 
* रोजचा महसूल- 8 लाख 
* रोजचा तोटा- 2 लाख 

 

केएमटी बससेवा केव्हाही सुरू करायला आम्ही सज्ज आहोत. तशी तयारी सुरू आहे. सॅनिटायझर मारून बस निजंर्तुकीकरण केल्या आहेत. शासन आदेश येताच, चालक, वाहकांना मास्क घालणे बंधनकारक करून सेवा सुरू केली जाईल. 
- प्रतिज्ञा महेश उत्तुरे, सभापती, परिवहन समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com