कोल्हापुरात कोरोना बाधितांनी केले शतक पूर्ण

डॅनिअल काळे
सोमवार, 13 जुलै 2020

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये गंजीमाळ, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ, राजारामपुरी, राजोपाध्येनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली

कोल्हापूर ः शहरात आज एकाच दिवसात तब्बल २० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरात सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 10८ झाली. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये गंजीमाळ, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ, राजारामपुरी, राजोपाध्येनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. रुग्णांचे पत्ते शोधणे, कंटेन्मेंट झोनची तयारी करणे, औषध फवारणी करणे रुग्णाचा संपर्काची माहिती संकलित करणे, यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. शहरात समूह संसर्ग सुरू झाला असून, नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. 
ताराबाई पार्क येथे पूर्वी रुग्ण सापडलेल्या ठिकाणी आणखी चार नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या परिसरात चिंता वाढली आहे. तेथे दोन स्वतंत्र बंगल्यात रुग्ण आढळल्याने परिसर सील न करता बंगले लॉक केले आहेत. त्याचबरोबर सदरबाजार फाळके हॉस्पिटल परिसरात एक रुग्ण आढळला आहे, तर सर्किट हाऊस परिसरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब दिले होते. रात्री उशिरापर्यंत येथे माहिती घेण्याचे काम सुरु होते. तथापि, परिसर सील केला नव्हता. 
....... 
राजारामपुरीत महिला डॉक्‍टरच पॉझिटिव्ह 
राजारामपुरीतील एका महिला डॉक्‍टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संबंधित हॉस्पिटल आज सील करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये संबंधित डॉक्‍टरांच्या संपर्कात कोण आले, याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यासाठी महापालिकेचे आरोग्य पथक कार्यरत होते. त्याचबरोबर हे रुग्णालय सील करून येथे औषध फवारणी करण्यात आली. या परिसरातील नागरिक यावेळी जमा झाले होते, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्या, गर्दी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले. 

टेंबलाईवाडीत कलानंद हाउसिंग सोसायटी सील 
टेंबलाई मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या कलानंद हाउसिंग सोसायटी येथील एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली. महापालिकेने तातडीने हा परिसर सील केला. या परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येथे उपाययोजना केल्या आहेत. 

गुलाब गल्लीचा संबंध नाही 
मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत रुग्णांचा कोणताही संपर्क आला नाही, मात्र येथील तुरबत परिसरात आणखी एका रुग्णाची नोंद झाली. या रुग्णाच्या कुटुंबातील तिघांना यापूर्वी कोरोनाची बाधा झालेली आहे. तेथे सापडलेले रुग्ण तुरबतीजवळ राहतात. खबरदारीचा उपाय म्हणून या गल्लीत बॅरेकेटिंग लावण्यात आले आहे. 

राजोपाध्येनगर संवेदनशील 
राजोपाध्येनगरमध्ये आज 1 रुग्ण आढळला. यापूर्वी येथे पाच रुग्ण आढळले आहेत. येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, हा परिसर संवेदनशील बनला आहे. 

कात्यायनी कॉम्प्लेक्‍स परिसर सील 
कळंबा ः कळंबा शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागांमधील कात्यायनी कॉम्प्लेक्‍स परिसरामध्ये राहणारा एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला सीपीआर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील तीन नातेवाइकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, युवराज दबडे, नगरसेविका अश्विनी रामाणे, मधुकर रामाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन हा परिसर बॅरिकेड्‌स लावून सील केला आहे. तसेच वैद्यकीय पथकाच्या वतीने येथील घरोघरी नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली असून, प्रत्येक गल्लीमध्ये कीटकनाशक औषधे मारून परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. महापालिका आरोग्य विभागाचे 15 कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. 

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur, Corona completed a century