शेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल पैसे गुंतवूया म्हणत साडेअकरा लाखाला घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

 

उचगावातील एकास अटक; तीन निवृत्तांना फटका 

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून 11 लाख 60 हजारांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज एकाला अटक केली. पुष्कराज शरदचंद्र सावंत (सध्या रा. मंगेशकर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती 

मोहन कृष्णाप्पा भंडारे हे क्रशर चौक (सानेगुरुजी वसाहत) येथे राहतात. ते "महावितरण'मधून निवृत्त झाले. त्यांच्या मित्रांनी त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल. आपण त्यात पैसे गुंतवूया, असे सुचविले. संशयित सावंत अशी गुंतवणूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्याशी भंडारे आणि त्यांचे मित्र चंद्रकांत कुलकर्णी, सुनील चव्हाण यांनी संपर्क साधला. पुष्कराजने त्यांना तुम्ही माझ्या बॅंक खात्यावर पैसे भरा, तुम्हाला बॅंकेपेक्षा अधिक परतावा मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार भंडारे यांनी बॅंक खात्यावरील व रोख असे दोन लाख एक हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. कुलकर्णी यांनी त्याला चार लाख 29 हजार, तर चव्हाण यांनी त्याला पाच लाख 30 हजार रुपये दिले. तिघांनी एकूण 11 लाख 60 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. 

हेही वाचा- वॉशिंग मशिन दुरुस्तीच्या बहाण्याने बेशुद्ध करून दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक -

संशयित पुष्कराजने सुरवातीला काही महिने संबंधित गुंतवणूकदारांच्या बॅंक खात्यावर लाभांश जमा केला. नंतर तो बंद झाला. याबाबत भंडारे, कुलकर्णी व चव्हाण यांनी विचारणा केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. लाभांशाबाबत विचारणा केल्यावर त्याने पैसे शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडात गुंतवलेले नाहीत. हे पैसे स्वतः वापरले आहेत. घर विकून पैसे परत देतो, असे सांगून बॅंकेचे तीन महिने मुदतीचे धनादेश दिले. ठरल्याप्रमाणे त्याने पैसे परत केले नाहीत. त्याने 16 एप्रिल ते 25 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत फसवणूक केली, अशी फिर्याद भंडारे यांनी दिली. त्यानुसार सावंतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. 

गुंतवणुकीच्या बनावट पावत्या 
गुंतवणूक केलेल्या रकमेबाबतच्या खोट्या पावत्या सावंतने गुंतवणूकदारांना दिल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. अशा पावत्या त्याने आणखी कोणाला दिल्या आहेत का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur crime case one man arrested