कोल्हापूर, गडहिंग्लजला ऑनलाईन...इचलकरंजीत मात्र अकरावी प्रवेश ऑफलाईनच...या तारखेपासून होणार प्रक्रिया सुरू

ऋषीकेश राऊत
Monday, 10 August 2020

यावर्षी कोरोनामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया इचलकरंजीत केंद्रीय प्रवेश पद्धतीने होईल, अशी अशा विद्यार्थ्यांना होती.

इचलकरंजी : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोरोनाच्या परिस्थितीतही शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली अचूक ठरत आहे. कोल्हापूर व गडहिंग्लज येथे शहरस्तरीय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असून, विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करत आहेत, मात्र इचलकरंजीत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. 

यावर्षी कोरोनामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया इचलकरंजीत केंद्रीय प्रवेश पद्धतीने होईल, अशी अशा विद्यार्थ्यांना होती, पण ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवडीच्या कनिष्ठ महाविद्यालय जाऊन प्रवेशासाठी नोंदणी करावी लागणार आहे. 14 ऑगस्टपासून शहरात ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 

शहरात सुमारे 20 कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित अशा 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. 14 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. 26 दिवसांच्या या प्रवेशप्रक्रिया कालावधीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावी प्रवेश देण्यासंबंधी कार्यवाही केली आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग मात्र शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असतील. 

..तर प्रवेशासंबंधी संभ्रमावस्था ! 
शहरातील अकरावी प्रवेशासाठी अनेक कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, पण विद्यार्थ्यांना ऑनलाइनबरोबर ऑफलाईन प्रवेश करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहरात अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

अशी होणार प्रवेशप्रक्रिया 
14 ते 19 ऑगस्ट .......... फॉर्म देणे व स्वीकारणे 
20 ते 24 ऑगस्ट ..........प्रवेश अर्ज छाननी, तपासणी, निवड व प्रतीक्षा यादी तयार करणे 
25 ऑगस्ट.................दुपारी 3 वाजेपर्यंत निवड व प्रतीक्षा यादी लावणे 
26 ते 31 ऑगस्ट...........निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 
2 ते 5 सप्टेंबर...............प्रतीक्षा यादीतील शिल्लक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 
7 ते 9 सप्टेंबर ................रिक्त जागांवर एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur, Gadhinglaj Online... But In Ichalkaranji The Eleventh Class Entry Is Offline Kolhapur Marathi News