एका बापाची चटका लावणारी अखेर...! आता त्या मुलाचे काय होणार...?

नंदिनी नरेवाडी
Monday, 18 May 2020

मुलावरील उपचार महागडा. पण, हा बाप दमला नाही. अखेर...
 

कोल्हापूर : त्यांच्या मुलाला ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सी या आजाराने ग्रासले... मुलावरील उपचार महागडा. पण, हा बाप दमला नाही. सलग सात ते आठ वर्षे अनेकांचा उंबरा झिजवून पै-पै जमवत होता आणि मुलावर उपचार करत होता...मात्र थोड्याच दिवसांपुर्वी मुलाची प्रकृती थोडी सुधारत असतानाच त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मिरजकर तिकटी येथे राहणाऱ्या प्रताप जाधव यांची ही दुर्देवी कहानी. 

प्रताप जाधव हे पत्नी सुमंगल व मुलगा विजय यांच्यासोबत अंबाबाई मंदिराशेजारील रंकोबा मंदिराजवळील छोट्याशा खोलीमध्ये राहत होते. साधारण आठ वर्षापुर्वी त्यांच्या मुलाला ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सी या आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. त्यावेळी त्या एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. मुलाच्या उपचारासाठी पैसे गोळा करताना व त्याला दवाखान्यात नेताना त्यांची कसरत होत होती. यामुळे त्यांनी खाजगी नोकरी सोडली आणि पुर्ण वेळ मुलाच्या उपचारासाठी पैशांची जमवाजमव करत होते.

याच वेळी त्यांच्या पत्नी सुमंगल या तीन चार घरी काम करून कसाबसा उदरनिर्वाह करायच्या. मित्रमंडळी, नातेवाईक व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलाच्या उपचाराचा खर्च भागवत होते. मुलगाही आई-वडींलावर उपचाराच्या खर्चाचा भार पडू नये, यासाठी नोकरी करू लागला. अशातच त्याची प्रकृती सुधारत होती पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 

हेही वाचा- सोमवारची सकाऴ कोल्हापूरसाठी धक्कादायकच : आणखी 5 रुग्ण आढळले संख्या गेली 54 वर...

मुलाच्या उपचारासाठी सात ते आठ वर्षे सुरू होती धडपड  

पंधरा दिवसांपुर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तपासणीअंती त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज त्यांच्याकडे नव्हती. पत्नी सुमंगल यांनी नातेवाईक, मित्रमंडळी व स्वंयसेवी संस्थाच्या मदतीने थोडेफार पैसे उसने घेतले. यातून किमो, रेडिएशन, औषधे व तपासणीसाठी पैसे जमले. त्यातून त्यांच्यावर उपचारही होऊ लागले. त्यांना बरे वाटून डिस्चार्जही मिळाला. मात्र पाच- सहा दिवसांपुर्वी त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल करावे लागले आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur hurttuch family story for son and father