कबनूरमधील तरूणाचा खून निवडणूक वादातून 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इचलकरंजी - कबनूर येथील संदीप मागाडे याचा ग्रामपंचायत निवडणुकीतील वादातूनच खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुणाल भिकाजी कांबळे (वय 19 रा. सिध्दार्थनगर, कबनूर) याने फिर्याद दिली आहे. 

कुमार कांबळे, रवि कांबळे, रमजान सनदी, मुदस्सर खुदबुद्दीन घुणके (वय 21 रा. सिध्दार्थनगर), असिफ खताळ, शाहरुख आझाद शेख (वय 24 रा. दर्गामागे कबनूर), रोहन सतिश कुरणे (वय 20 रा. सिद्धार्थनगर), शाहरुख मुबारक अत्तार (वय 22 रा. जवाहरनगर), राहुल अनिल शिंदे (वय 29 रा. सिद्धार्थनगर), आकाश कांबळे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर यांसह 6 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी मुदस्सर घुणके, शाहरुख शेख, रोहन कुरणे, शाहरुख अत्तार व राहुल शिंदे यांना अटक केली आहे. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनुरातील भीमराज भवन परिसरातील संदीप मागाडे आणि संशयित कुमार कांबळे यांच्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालवेळी वाद झाला होता. या वादातूनच संदीप मागाडे यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय संदीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. तपासात हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाल्याने व पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर संदीप याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात आला. 

हे पण वाचा मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

 

 अंत्ययात्रेला मोठा बंदोबस्त 
संदीप मागाडे यांची अंत्ययात्रा काल सकाळी काढण्यात आली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. कबनूर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सहभागी महिला व पुरुष यांनी खून करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.  

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur kabnur boys murder in politics issue