नादच खुळा! कोल्हापूरच्या साबळेवाडीतील पती-पत्नीने घडविला इतिहास, संपूर्ण गावात होतेय चर्चा

कुंडलिक पाटील 
Thursday, 28 January 2021

संभाजी आंबी गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून काम करतात

कुडित्रे (कोल्हापूर) : साबळेवाडी (ता.करवीर) येथे संभाजी आंबी हे ग्रामपंचायतीत कर्मचारी आहेत. आता याच ग्रामपंचायतील त्यांच्या पत्नी ज्योती आंबी या सरपंच होणार आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीमध्ये पती कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, त्याच ग्रामपंचायतीमध्ये पत्नी सरपंच म्हणून गावकारभार सांभाळणार आहेत. त्यामुळे या पती-पत्नीच्या यशाची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. 

संभाजी आंबी गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून काम करतात. कोरोना काळात संभाजी आंबी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार ही देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लागल्यानंतर कोणताही राजकीय वारसा आंबी यांच्या मागे नसताना, कॉंग्रेसच्यावतीने शाहू विकास आघाडीमध्ये पत्नी ज्योती आंबी त्यांना ओबीसीमधून उमेदवारी देण्यात आली. सुदैवाने विरोधी गटात उमेदवार असूनही त्यांनी उमेदवार उभे केले नाहीत. यामुळे ज्योती आंबी या बिनविरोध निवडून आल्या. आणि पहिला विजय त्यांच्या पदरी पडला. 

हे पण वाचा भाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम

आज सरपंच पदाचे आरक्षण काढल्यानंतर साबळेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ओबीसी स्त्री आरक्षण निघाले आणि ज्योती आंबी यांच्या गळ्यात आपसूकच सरपंच पदाची माळ पडली. यावेळी संभाजी आंबी यांना व पत्नी ज्योती आंबी यांना बिनविरोध निवडणूक होऊन सरपंच पद मिळाल्यानंतर आनंद अनावर झाला. या घटनेनंतर करवीर तालुक्‍यात या निवडीची चर्चा सुरू झाली. ग्रामपंचायत क्‍लार्क संभाजी आंबी यांना सरपंच झाल्याच्या शुभेच्छा देण्याचे फोन वाजू लागले. दरम्यान संभाजी व ज्योती आंबी यांच्याशी संपर्क साधला असता. पती संभाजी म्हणाले, मी कर्मचारी म्हणून ग्रामपंचायतीचे काम प्रामाणिकपणे करत राहीन तर सरपंच ज्योती आंबी म्हणाल्या गावाच्या विकासासाठी मी काम करत राहीन. 

                       
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur karveer taluka sablewadi sarpanch kolhapur political news