कोल्हापूर बाजार समितीत अखेर सभापती, उपसभापतींचे राजीनामे... पुढे काय वाचा...

शिवाजी यादव
Wednesday, 5 August 2020

शेती उत्पन्न बाजार समिती नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीरपणे झाल्याच्या तक्रारी आहेत.

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दशरथ माने, उपसभापती शारदा पाटील यांनी  मंगळवारी राजीनामे दिले. पंधरा संचालकांनी कालच राजीनामे दिले आहेत. आज (बुधवार) या संचालक मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक येण्याची शक्‍यता दाट आहे. 

शेती उत्पन्न बाजार समिती नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीरपणे झाल्याच्या तक्रारी शिवसेनेचे संचालक प्रतिनिधी ऍड. किरण पाटील, भाजपचे नाथाजी पाटील, भगवान काटे आदींनी जिल्हा निबंधकांकडे केल्या होत्या. "सकाळ' मधूनही बेकायदेशीर कामकाजाचा पोल-खोल झाला होता. त्याची दखल घेत जिल्हा निबंधकांनी तीन अधिकाऱ्यांच्या समितीतर्फे बाजार समितीची चौकशी सुरू केली आहे. 

या चौकशी समितीचा अहवाल तयार होत आहे. यात संचालक मंडळ बरखास्तीची शक्‍यता अधिक असल्याची बाब विचारात घेऊन बहुतांशी संचालकांनी काल जिल्हा निबंधकांकडे राजीनामे दिले. त्यापाठोपाठ उपसभापतीनी आपला राजीनामा सभापतींकडे दिला. सभापतींनी आपला राजीनामा जिल्हा निबंधकांकडे दिला आहे. 

दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल अद्यापही तयार झालेला नाही किंवा जिल्हा निबंधकांना तो मिळालेला नाही. मात्र, चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. अशात जिल्हा बाजार समितीवर प्रशासक येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ येणार असल्याची हुल कालपासून बाजार समिती वर्तुळात उठवली गेली आहे. राष्ट्रवादीच्या एका जिल्ह्यात नेत्याला अध्यक्ष करणार असल्याचेही सांगितले जात आहे, असे झाल्यास बाजार समिती झालेले बेकायदेशीर व्यवहार, त्यानंतर झालेले आरोप, तक्रारी यांची तीव्रता कमी व्हावी, यासाठी असा प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या गटाकडून मात्र कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीवर प्रशासक यावा, यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे विश्‍वासनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. 

आठ गाळ्यांचे भाडे करार पूर्ण?

शेती उत्पन्न बाजार समितीतील आठ गाळ्यांचे संदर्भातील भाडेकरार आज झाल्याचे सांगण्यात आले. जबाबदार घटकांच्या उपस्थित दुय्यम निबंधक कार्यालयात व्यापारी दराने गाळ्याचे मूल्यांकन करून भाडे करार पूर्ण केल्याचे समजते. त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड, ठराव देणे, स्टॅम्प ड्यूटी भरणे अशी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजते. याची माहिती आज दुपारी बाजार समितीशी संबंधित मोजक्‍याच घटकांपर्यंत पोहोचली होती; मात्र खरेच असे झाले आहे का, याविषयी समितीशी संबंधित घटक एकमेकांकडे रात्री उशिरापर्यंत खात्री करून पाहत होते. या व्यवहारात नेमके कोण होते, हे मात्र अधिकृतरीत्या समजू शकलेले नाही.

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur market committee chairman, deputy chairperson finally resign ... read more ...