विद्यमान ३४ नगरसेवकांना फटका: हक्काचा प्रभाग आरक्षित झाल्याने घुसखोरीची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

काही मातब्बरांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने ते पत्नीला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत.

कोल्हापूर: महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल आरक्षण सोडतीनंतर सुमारे ३४  विद्यमान नगरसेवकांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. पण आजूबाजूच्या प्रभागात घुसखोरी करून निवडून येण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. 

काही मातब्बरांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने ते पत्नीला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. तर ओबीसी दाखल्यासाठीही जुने रेकॉर्ड शोधण्याच्या कामाला अनेक जण लागले आहेत. पुढील अडीच वर्षे महापौरपद हे ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने ओबीसी महिला आरक्षित प्रभागातील लढतींमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या मावळत्या सभागृहात महापौरपद भूषविलेल्या निलोफर आजरेकर यांचा प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्याऐवजी त्यांचे पती अश्‍कीन आजरेकर आगामी निवडणुकीत कॉमर्स कॉलेज प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत.

उपमहापौर म्हणून काम केलेल्या संजय मोहिते यांचा प्रभाग ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित राहिल्याने त्यांची कोंडी होणार असून पत्नीला रिंगणात उतरविता येईल का, याचा विचार ते करत आहेत. ॲड. सूरमंजिरी लाटकर यांचा शाहू कॉलेज हा प्रभाग सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्यांना या ठिकाणी उभे राहणे शक्‍य आहे. तर स्मिता माने यांचा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागात त्यांचे पती आणि शेजारच्या शाहू कॉलेज प्रभागात स्मिता माने या सूरमंजिरी लाटकर यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून काम केलेल्या सत्यजित कदम यांचा हक्काचा कदमवाडी भोसलेवाडी हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता कविता माने यांच्या प्रभागातून उभे राहावे लागणार आहे. या दोघांमध्ये प्रभागांची अदलाबदल करावी लागणार आहे. या विभागात सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जात असल्याने आजूबाजूच्या प्रभागांवरही त्यांची कमांड आहे. हीच परिस्थिती सदरबाजार, विचारेमाळसह आजूबाजूच्या अन्य काही प्रभागांच्या बाबतीत राजू लाटकर यांची आहे.

पत्नीचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिल्याने पत्नीला ते तिथे उभा करण्याची शक्‍यता आहे. तर सदरबाजार या प्रभागातून ते स्वतः निवडणूक लढवितील, अशी शक्‍यता आहे. प्रभाग क्रमांक ११ ताराबाई पार्क हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने तेथे रत्नेश शिरोळकर यांची अडचण झाली आहे. या प्रभागात माजी नगरसेविका पल्लवी देसाई निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. नागाळा पार्क प्रभागात अर्जुन माने, व्हीनस कॉर्नर प्रभागात राहुल चव्हाण, रमणमळा प्रभागात राजाराम गायकवाड यांना फटका बसला आहे. व्हीनस कॉर्नर, नागाळा पार्क प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. राहुल चव्हाण हे त्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवितात का, याकडे लक्ष आहे. तर पूजा नाईकनवरे या शाहूपुरी तालीम प्रभागातून व्हीनस कॉर्नर प्रभागात घुसखोरी करण्याची शक्‍यता आहे. सभागृह नेते दिलीप पोवार यांच्या कनाननगर प्रभागावर ओबीसी आरक्षण पडले आहे. त्यामुळे तूर्त ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. ते इतर खुल्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 शिवाजी पार्कमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने आशिष ढवळे यांची कोंडी झाली आहे. महाडिक वसाहत या प्रभागातूनही सीमा कदम यांचा विभाग ओबीसीसाठी आरक्षित असल्याने त्याचा दाखला नसेल तर त्यांनाही निवडणूक लढवता येणार नाही. मुक्त सैनिक वसाहतचे राजसिंह शेळके, शाहू मार्केट यार्डच्या सुरेखा शहा यांचे प्रभाग मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही या प्रभागातून निवडणूक लढविता येणार नाही. पण ते शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

यांना बसणार धक्का
सुभाष बुचडे, संदीप नेजदार, अशोक जाधव, स्वाती यवलुजे, राजाराम गायकवाड, दिलीप पोवार, आशिष ढवळे, सीमा कदम, राजसिंह शेळके, सुरेखा शहा, कमलाकर भोपळे, प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, उमा इंगळे, संजय मोहिते, किरण शिराळे, ईश्‍वर परमार, अजित ठाणेकर, शमा मुल्ला, संदीप कवाळे, विलास वास्कर, शेखर कुसाळे, राहुल माने, महेश सावंत, अश्‍विनी बारामते, वहिदा सौदागर, सुनील पाटील, इंदूमती माने, रिना कांबळे, राजू दिंडोर्ले, गीता गुरव, मेघा पाटील, वनिता देठे, अभिजित चव्हाण.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation election 2021 34 corporator preparation