कल कोल्हापूर महापालिकेचा : खराब रस्ते, वाहतूक कोंडी ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

निवडणुकीच्या चर्चा वाढीस लागलेल्या असताना निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल ‘सकाळ’ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.

कोल्हापूर : महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत संपुष्टात येऊन दोन महिने होत आले आहेत. आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रशासनाने त्यासाठीची तयारी करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग आरक्षणाची सोडत झाली असून, हरकतीही नोंदवल्या गेल्या आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कार्यरत आहे; तर भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे.

वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली, तशी स्थानिक पातळीवरही ती बदलत आहेत. राज्यात महाआघाडीचे सरकार असले तरी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मात्र सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात चौरंगी लढती होणार हे स्पष्ट आहे. यामध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीही होतील, तर काही ठिकाणी ‘नुरा’ लढतीही होताना दिसतील. निवडणुकीच्या चर्चा वाढीस लागलेल्या असताना निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल ‘सकाळ’ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.

कोणतीही महापालिका नागरिकांच्या मूलभूत गरजा म्हणजेच रस्ते, पाणीपुरवठा व कचरा उठाव यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करते; परंतु कोल्हापूर महानगरपालिकेत हे मूलभूत प्रश्‍नच सोडवण्यासाठी वर्षानुवर्षे गोगलगायीच्या चालीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. शहरातील प्रमुख समस्यांविषयी नागरिकांची मते जाणून घेतली असता, शहरातील नागरी समस्यांबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून आले. 

खराब रस्ते व वाहतुकीची कोंडी याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरातील खराब रस्ते आगामी निवडणुकीत परिणामकारक ठरतील, असे ६०.७ टक्के नागरिकांना वाटते. रस्ते तयार करण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते; परंतु आजही या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांची हाडे खिळखिळी करण्याचे काम खड्ड्यांमुळे होत असल्याचे विदारक चित्र आहे.

खराब रस्त्यांच्या जोडीलाच वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थित जागा नाही; परंतु दारा-दारात चारचाकी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व सक्षम नाही, यासह विविध कारणांमुळे ५४.३ टक्के नागरिकांच्या दृष्टीने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असल्याचे मत व्यक्त झाले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न भेडसावत असल्याचे मत ४० टक्के नागरिकांनी नोंदवले आहे. कोरोनाच्या तडाख्यानंतर हा प्रश्‍न सर्वांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. वाहतूक कोंडीबाबत ४७.३ टक्के नागरिकांनी प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन योग्य केले नसल्याचे स्पष्ट मत नोंदवले आहे. तर ३२.८ टक्के नागरिकांनी महापालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे मत नोंदवले आहे. १९.८ टक्के नागरिकांना वाहनचालकांना शिस्तच नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे असे वाटते.

दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या ३५.१ टक्के नागरिकांना भेडसावत आहे. स्वच्छ व मुबलक पाणी कोल्हापुरात उपलब्ध असतानाही नागरिकांना हा प्रश्‍न अद्याप भेडसावत असल्यामुळे नियोजनाच्या पातळीवर याची खरेच दखल घेण्याची वेळ आली आहे, हे स्पष्टपणे समोर येते. थेट पाईपलाईन योजना लवकरात लवकर मार्गी लावणे हा यासाठी एक मार्ग असू शकतो; पण त्याचबरोबर पाणीवाटपाच्या नियोजनापासून साऱ्याच गोष्टींवर विचार करण्याची वेळ आली आहे. 

शहरातील कचऱ्याबद्दल ३०.६ टक्के तर शहर सुशोभीकरणातील अनास्थेबाबत २६.२ टक्के नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे. कचरा उठावासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे; परंतु अद्यापही काही भागात ही समस्या दिसतेच आहे. ती सोडविण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.

वाहतुकीची कोंडी-  ५४.३%
खराब रस्ते-  ६०.७%
सार्वजनिक वाहतूक- ४०%
दूषित पाणीपुरवठा - ३५.१%
आरोग्यसेवा- २५.३%
शहराचे सुशोभीकरण- २६.२%
वाढता कचरा अस्वच्छता- ३०.६%

वाहतूक नियोजनाचा अभाव - ४७.३% 
दोन्ही खात्यांमधील समन्वयाचा अभाव - ३२.८% 
नागरिकांची बेशिस्त -१९.८% 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election by daily sakal