कल कोल्हापूर महापालिकेचा : महाविकास आघाडी म्हणजे ‘मैत्रिपूर्ण फसवणूक’

kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal
kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal

कोल्हापूर :  महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल "सकाळ'ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा

 महापालिकेतील पाच वर्षांतील कारभाराबद्दल काय वाटते?
उत्तर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी झाली; याचा पहिला प्रयोग कोल्हापूर महापालिकेतच झाला. खराब रस्ते, सार्वजनिक आरोग्य विभागाची वानवा, महापालिका शाळांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा,  महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न, महापालिकेकडून नागरिकांना त्यांच्या कामासाठी होणारा मनस्ताप सुरूच आहे. घरफाळा, पाणीपट्टीच्या रूपाने नागरिक महापालिकेला कर देतात; पण त्या बदल्यात त्यांच्या नशिबी केवळ अवहेलनाच आली आहे. गेल्या दहा वर्षांत शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्‍नच मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, शहर सुशोभीकरण, पर्यटन विकास या महत्त्वाच्या गोष्टींपासून सत्ताधारी अद्याप दूरच आहेत.

महापालिकेच्या रखडलेल्या प्रश्‍नांबद्दल आपली भूमिका काय?
उत्तर : कायदे, नियम यांच्या आधारे मार्ग काढून शहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडवणे आवश्‍यक होते; पण महाविकास आघाडीने काहीच केले नाही. महापालिका गाळेधारकांचा प्रश्‍न अद्याप तसाच आहे. रेडीरेकनरचा मुद्दा जरी महत्त्वाचा असला तरी महापालिकेने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढणे आवश्‍यक होते. थेट पाईपलाईन योजना अद्याप अपूर्णच आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या शासकीय परवानग्यांची पूर्तता न करता केवळ श्रेयासाठी ही योजना सुरू केली. त्यामुळे यातील अडथळे वाढले. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांसाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २५ कोटी रुपयांचा निधी आणला; मात्र हा निधी रस्त्यांवर खर्चच झाला नाही. पर्यायाने रस्त्यांचा प्रश्‍न अद्यापही तसाच आहे. झोपडपट्ट्यांमधील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नही तसाच आहे. भाजप - ताराराणीच्या नगरसेवकांना निधी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते. सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्‍नही अद्याप जैसे थे आहे. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची आमची भूमिका आहे.

 आगामी निवडणुकीत भाजपचा अजेंडा काय?
उत्तर : शहरातील रखडलेले प्रश्‍न मार्गी लावणे. सार्वजनिक वाहतूक व आरोग्य व्यवस्था अत्याधुनिक आणि सक्षम करणे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून प्रशासन पारदर्शक व गतिमान करणे. नवे रस्ते आणि विनाअडथळा वाहतूक, महापालिका उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, शहर सुशोभीकरण, पर्यटन विकास करणे, नागरी सुविधा ऑनलाईन करून वॉर्ड ऑफिस अधिक सक्षम करणे. मैदाने, उद्याने अधिक चांगली करणे, महापालिकेची वाचनालये चांगली बनविणे हे आमचे प्राधान्याचे विषय असतील. महापालिकेबाबत नागरिकांच्या मनात विश्‍वासाची भावना तयार होईल असा कारभार आम्ही करून दाखवू. 

 महाविकास आघाडीच्या आव्हानाबद्दल काय वाटते?
उत्तर : महाविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत. त्याला ते मैत्रिपूर्ण लढत असे म्हणतात. पण एका प्रभागात आघाडीचे तीन उमेदवार उभे राहणार; मग ही निवडणूक मैत्रिपूर्ण कशी होणार? तिन्ही पक्षांचे नेते आपल्याच कार्यकर्त्यांसमोर आव्हाने उभी करून त्यांची फसवणूक करत आहेत. स्वबळावर लढण्याचे नाटक करून पुन्हा एकत्र येण्याचा त्यांचा छुपा अजेंडा आहे. ते जनतेचीही फसवणूक करत आहेत. महाविकास आघाडीने कार्यकर्ते आणि जनतेची केलेली ही ‘मैत्रिपूर्ण फसवणूक’ आहे. भाजपविरोधातील मते या तिघांमध्ये विभागली जातील व त्याचा फायदा भाजप, मित्र पक्षांनाच होणार आहे. त्यामुळे या वेळी महापालिकेत सत्तांतर होणार हे नक्की.

महेश जाधव म्हणाले...
 शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकासापासून सत्ताधारी दूरच
 थेट पाईपलाईन योजना अद्यापही रखडलेलीच
 सार्वजनिक वाहतूक व आरोग्य व्यवस्था सुधारणार
 पारदर्शक व गतिमान कारभार देणार

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com