
लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल "सकाळ'ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा
महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचे नियोजन कसे?
उत्तर : महापालिका निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेचा वापर कुबड्यांप्रमाणे झाला आहे. आगामी निवडणुकीमध्ये तसा वापर होऊ देणार नाही. ‘यूज ॲन्ड थ्रो’ खपवून घेतले जाणार नाही. सर्व ८१ जागांवर उमेदवार उभे नाही केले, तरी पंधरा ते वीस जागा निवडून आणण्याचे लक्ष्य आहे. या जिंकलेल्या जागांच्या जोरावरच पहिला महापौर शिवसेनेचाच असेल.
महाविकास आघाडीबाबत मत काय?
उत्तर : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे. तिन्ही पक्ष राज्यात सत्तेवर आहेत. महापालिकेची निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्रपणे याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर होईल. वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणेच कार्यवाही होईल. जेवढ्या जागा लढवण्यास सांगतील तेवढ्या जागा लढवण्याची तयारी असेल.
उमेदवारी नेमकी कोणाला देणार?
उत्तर : उमेदवारी देताना कट्टर शिवसैनिक हाच उमेदवारीचा सर्वांत महत्त्वाचा निकष असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्यांना तसेच ‘इलेक्टिव्ह मेरीट’ असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल. निवडून आणण्यासाठी जी आयुधे वापरावी लागतात ती नक्की वापरू.
शहराच्या विकासाबाबत व्यापक विचार कधी होणार?
उत्तर : कोल्हापूर शहराच्या पाठीमागून काही शहरे पुढे गेली, यामध्ये नक्कीच तथ्य आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी शहराची हद्दवाढ होऊ शकलेली नाही. कोल्हापूर शहराची हद्दवाढच न झाल्यामुळे विकास होऊ शकलेला नाही. शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता आल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅपच आमच्याकडे तयार आहे. या माध्यमातून सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर देऊ.
उत्तर मतदारसंघ आपल्या हातातून निसटला...
उत्तर : राजकारणात चढ-उतार येतच असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे. पूर्वीपासून या मतदारसंघाने शिवसेनेला साथ दिली आहे. आम्हीही विकासकामांचा डोंगर उभा केला. पण एखाद्या पराभवाने सर्व काही संपले असे होत नाही. शहरवासीयांच्या विश्वासाच्या जोरावर महापालिकेत दमदार कामगिरी करू. महापालिकेत आम्ही सत्तेच्या चाव्या आमच्या हाती ठेवू.
अंतर्गत मतभेदामुळे शिवसेनेचे नुकसान होत नाही का?
उत्तर :निश्चितपणे नुकसान होते; मात्र ज्यांच्यामुळे नुकसान झाले त्यांचा हिशेब लवकरच होणार आहे. मुखी शिवसेनेचे नाव आणि काम मात्र उलटे, हे जास्त दिवस चालत नाही.
शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी झाली...
उत्तर : जिल्ह्यात शिवसेना आमदारांची संख्या कमी झाली हे काही चांगले नाही. तत्कालीन परिस्थिती जय-पराजयास कारणीभूत असते; मात्र आगामी काळात जिल्ह्यामध्ये शिवसेना आमदारांची संख्या वाढेल.
राजेश क्षीरसागर म्हणाले...
इच्छाशक्तीअभावी शहर हद्दवाढ रखडली
शहराचे आधुनिकीकरण साधण्यावर भर
आता ‘यूज अँड थ्रो’ खपवून घेणार नाही
‘इलेक्टिव्ह मेरीट’ असलेल्यांनाच उमेदवारी
कल कोल्हापूर महापालिकेचा संपूर्ण आराखड्याचे संकलन :
निवास चौगले, संभाजी गंडमाळे, सदानंद पाटील, लुमाकांत नलवडे, सुनील पाटील, डॅनियल काळे, शिवाजी यादव, राजेश मोरे, संदीप खांडेकर, ओंकार धर्माधिकारी, अमोल सावंत, सुयोग घाटगे, नंदिनी नरेवाडी-पाटोळे, मतीन शेख.
मांडणी : नेताजी खाडे
संपादन- अर्चना बनगे