कल कोल्हापूर महापालिकेचा : नव्या महापालिका इमारतीसह ‘ई-ऑफिस’ प्रक्रिया राबविणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल "सकाळ'ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा
 

 महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय?
उत्तर : महापालिका निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवरच लढली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र शासनाकडून अपेक्षित निधी मिळालेला नाही. महाआघाडीच्या सरकारने २०२० मध्ये सुमारे ५० कोटीपर्यंतचा निधी आणला आहे. आता विकासकामांना गती देणार आहोत.

 प्रशासकीय कामांना गती व लोकाभिमुख योजनांबाबत काय?
उत्तर : महापालिकेची नवी इमारत उभारण्याचा अजेंडा आहे. प्रशासकीय यंत्रणा सुटसुटीत करण्यासाठी नव्या इमारतीची गरज आहे. ती उभारण्यासाठी आवश्‍यक निधी राज्य शासनाकडून आणणार आहोत. प्रशस्त इमारत झाल्यानंतर प्रशासकीय कामांचे विभाजन होईल आणि त्यातून कामांना गती मिळेल. ई-ऑफिस पद्धतीने महापालिकेचे काम सुरू करण्याचा विचार आहे. तंत्रज्ञानातून सर्व प्रणाली सोपी आणि नागरिकांसाठी सुलभ करू. एका क्‍लिकवर नागरिकांना सुविधा देण्याचे नियोजन आहे.

 उपनगरांना नागरी सुविधा केव्हा मिळणार?
उत्तर ः उपनगरे वाढत आहेत. त्या मानाने त्यांना निधी मिळावा यासाठी स्वतंत्रपणे निधीची व्यवस्था केली जाईल. रस्ते, गटारांसोबतच ड्रेनेज व्यवस्थेसाठी नव्याने आराखडा तयार करू. त्यातून उपनगरांत नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न करू. 

 आयटी पार्क, नाट्यगृहाचे विषय आजही प्रलंबित आहेत...
उत्तर ः आयटी पार्कसाठी आयआरबी कंपनीकडील इमारत महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा मुद्दा होता. तो निकाली निघाल्यामुळे लवकरच आयटी पार्कचा विषयही मार्गी लागेल. नाट्यगृहासाठी बेलबागेतील जागा उपलब्ध झाली आहे. तोही विषय निकाली काढला जाईल.

 शहर सुशोभीकरणासाठी काय करणार?
उत्तर ः शहर सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. हुतात्मा पार्क आणि महावीर गार्डनसाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी आणला आहे. फॅमिली गार्डन अशी संकल्पना ठेवून दोन्ही ठिकाणी विकास केला जाईल. प्रत्येक आयलॅण्डचे सुशोभीकरण खासगीकरणातून केले जाईल. क्रांतिसिंह नाना पाटीलनगरात पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक होत आहे.

 पार्किंग व्यवस्था, दाभोळकर कॉर्नरची कोंडी कशी फोडणार?
उत्तर ः भाऊसिंगजी रोडवरील जागेत बहुमजली कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स आणि पार्किंगची व्यवस्थेचे नियोजन आहे. शिवाजी मार्केट येथेही नव्याने काय करता येईल, याचा विचार सुरू आहे. संभाजीनगर एसटी स्टॅंडचे नूतनीकरण होणार आहे, तेथेच केएमटीचीही व्यवस्था होईल. दाभोळकर कॉर्नर येथील खासगी आरामबसचा थांबा ताराराणी पुतळ्याजवळील अग्निशमन दल कार्यालयाच्या मागील बाजूस स्थलांतरित केला जाईल. 

 आगामी निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय?
उत्तर ः महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाकडून लढविल्या जातील. त्याची सर्व प्रक्रिया पक्षाच्या धोरणानुसार होईल. त्या-त्या वेळी सर्व निर्णय घेतले जातील; मात्र केंद्रस्थानी विकासाचा मुद्दाच असेल.

सतेज पाटील म्हणाले...
 उपनगरांसाठी स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था करणार
 कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स व पार्किंगची व्यवस्था करणार
 हुतात्मा पार्क व महावीर गार्डन येथे फॅमिली गार्डन साकारणार
 दाभोळकर कॉर्नरचा खासगी बसचा थांबा हलवणार

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal