
लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि नव्या सभागृहातील सदस्य निवडतील, याचा कल "सकाळ'ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिका काय आहेत याचा आढावा
महापालिका निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांद्वारे लोकांसमोर जाणार?
उत्तर ः गेली पंधरा वर्षे आम्ही महापालिकेत सत्तेत आहोत. पहिली पाच वर्षे जनसुराज्यसोबत तर नंतर दहा वर्षे काँग्रेससोबत सत्ता कायम आहे. प्रामुख्याने शहरातील रस्ते, गटारे, स्वच्छ पाणी व्यवस्था, क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, शिवाजी विद्यापीठासह विविध कामांसाठी ५० कोटी रुपये, राजाराम महाविद्यालय, रंकाळा सुशोभीकरण, हॉकी स्टेडियम, विमानतळ विकास अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. या कामांच्या जोरावरच आम्ही लोकांकडे मते मागणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान का करावे?
उत्तर ः पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून केला आहे. आत्ताही राज्यात आमच्याकडे सत्ता आहे. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद, अर्थमंत्रिपद आहे. या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळेच नागरिक राष्ट्रवादीला मतदान करतील, असा विश्वास वाटतो.
कोणती कामे पूर्णत्वास गेली नसल्याची खंत वाटते?
उत्तर ः शहराला अद्ययावत नाट्यगृह नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाला मर्यादा आहेत. दोन हजार लोकांसाठीचे सभागृह बांधण्याची योजना आहे. उद्याने चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न होता, त्याला म्हणावी तेवढी गती मिळालेली नाही. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे बंद झालेले नाही. यामुळे विविध प्रकल्प राबवता येत नाहीत. ही कामे राहून गेली आहेत.
महापालिका सत्तेत असताना स्वतंत्र निवडणूक का लढवत आहात?
उत्तर ः आधीच आघाडी केल्यास पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतात. ‘महाविकास आघाडी’तील पक्षांचे असे नाराज कार्यकर्ते भाजप किंवा ताराराणी आघाडीकडे जाऊ नयेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, म्हणूनच स्वतंत्र निवडणूक लढवली जात आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढवणार आहे. निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी होण्याचे कारण?
उत्तर ः महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या २५ वरून १५ इतकी खाली आली ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेत जरी सत्ता आली तरी त्याचा पक्षवाढीसाठी फारसा उपयोग होत नाही. शहरात पक्ष वाढवण्यासाठी पक्षाच्या चिन्हावरील आमदार असणे गरजेचे आहे. तसे झाल्यास पक्ष वाढणार आहे; मात्र शहर विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे.
‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांना सोबत घेणार का?
उत्तर ः जनसुराज्य शक्ती पक्षासोबत आम्ही महापालिका निवडणुकीत १५ वर्षांपूर्वी युती केली होती. मागील निवडणुकीत त्यांनी आमच्या आघाडीत येण्यापासून अंग काढून घेतले. यावेळी अद्याप त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही.
प्रा. जयंत पाटील कोठे आहेत?
उत्तर ः प्रा. जयंत पाटील कोठेही गेलेले नाहीत. ते महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबतच असणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी त्यांचे किरकोळ मतभेद आहेत; पण तो फार मोठा विषय नाही.
हसन मुश्रीफ म्हणाले...
केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध कामे मार्गी
उद्यानांचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देणार
आमदार कोरे यांच्यासोबत अद्याप चर्चा नाही
पक्षवाढीवर मर्यादा; पण कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे समाधान
संपादन- अर्चना बनगे