
कोल्हापूर : वरिष्ठ खेळाडूंसाठी लाखो रुपये मोजणाऱ्या स्थानिक संघांनी खेळाडू घडविण्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या ग्रासरूट फुटबॉलकडे दूर्लक्ष केले आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने पोलो मैदानावर घेतलेल्या 13 आणि 15 वर्षाखालील फुटबॉल लीग स्पर्धेत केवळ पाच संघच सहभागी झाले. गेली दोन वर्षे हिच अवस्था आहे. शहर परिसरात सर्व गटातील संघांची संख्या सुमारे अडीचशेहेहून अधिक असताना ग्रासरूट स्तरावरील संघांची तोकडी संख्या वेदनादायी आहे. ही बाब कोल्हापूरी फुटबॉलच्या विकासाला मारक ठरणारी आहे.
भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारावा यासाठी जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) शालेय खेळाडूंच्यासाठी खेळण्याची अधिक संधी निर्माण कराव्यात, अशी सूचना केली आहे. त्यानुसार भारतीय फुटबॉल संघटनेने 13, 15 आणि 18 वर्षाखालील इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेमुळे देशभरातील नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर सामने खेळण्याचा अनुभव मिळतो आहे. त्याच धर्तीवर गेल्या तीन वर्षापासून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे 13 आणि पंधरा वर्षाखालील स्पर्धा घेतली जाते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर या जिल्ह्यातून प्रत्येकी दोन अव्वल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातात. दरवर्षी मुंबईत कुपरेज मैदानावर ही स्पर्धा होते.
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने वरिष्ठ गटाच्या संघांना 13 आणि 15 वर्षाखालील संघ नोंदणीसाठी केलेल्या आवाहनाला दोन महिन्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. कोल्हापूर शहरातील खंडोबा अ, ब, पाटाकडील तालीम मंडळ, मंगळवार पेठ फुटबॉल क्लब आणि ग्रामीण भागातील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन सहभाग घेतला. एकीकडे आंतरजिल्हा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावून कोल्हापूरने राज्यातील फुटबॉल क्षेत्रात अव्वल असल्याचे अधोरेखित केले. त्याचवेळी ग्रासरूट स्तरावर मात्र संघांची असणारी उदासिनता वेदना देणारी आहे. वरिष्ठ गटातील संघ उत्कृष्ठ खेळाडू मिळविण्यासाठी जम्मू काश्मिरपासून केरळपर्यंत धावाधाव करतात. त्यासाठी वारेमाप रक्कम खर्च केली जाते. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या शासकीय स्पर्धा व्यतिरिक्त इतरवेळी नवोदित खेळाडूंना संधी नाही. परंतु, आपल्याच परिसरातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची मानसिकता संघांची नाही. वस्तूतः या स्पर्धेतून पात्र ठरणाऱ्या संघाना मुंबई, पुणे येथील व्यावसायिक संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळते. त्यातून खऱ्या अर्थाने खेळाडूंची जडणघडण होत असते. त्याकडेच मात्र संघांनी सोईस्करपणे दूर्लक्ष केल्याने फुटबॉल क्षेत्रात नाराजीचा सूर आहे.
------------------
कोट
केएसएच्या प्रत्येक बैठकीत वरिष्ठ संघांना या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. फुटबॉलचे चांगले वातावरण असताना संघांनी मानसिकता बदलायला हवी. पुढील हंगामात सर्वच संघांना 13 आणि 15 वर्षाखालील संघ सक्तीचे करण्यात येतील.
- प्रा. अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी, केएसए कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.