हेरिटेज ऑफ कोल्हापूर: पॅलेस थिएटर अन्‌ कुस्ती मैदान; जागतिक दर्जाच्या वास्तू

उदय गायकवाड
Friday, 4 December 2020

१९०२ मध्ये छत्रपतींनी आपल्या युरोप दौऱ्यात पाहिलेले रोमन पद्धतीचे कुस्ती मैदान कोल्हापुरात बांधण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर : कलेला राजाश्रय देणारं कोल्हापूर संस्थान संपूर्ण देशाला ओळखीचं झालं. कुस्ती, नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळी इथे मातब्बर झाली. त्याचं सार श्रेय छत्रपती शाहू महाराजांना आहे. पॅलेस थिएटर आणि कुस्ती मैदान हे त्या काळातील जागतिक दर्जा असलेल्या वास्तू बांधून क्रीडा, कलेची जोपासना केली.

१९०२ मध्ये छत्रपतींनी आपल्या युरोप दौऱ्यात पाहिलेले रोमन पद्धतीचे कुस्ती मैदान कोल्हापुरात बांधण्याचा निर्णय घेतला. मध्यभागी लाल मातीचे गोल मैदान, त्या भोवती रिकाम्या जागेत मल्ल, त्यांचे वस्ताद आणि विशेष पाहुणे बसायला जागा आहे. रणवाद्य वाजवण्याची जागा आणि पूर्वेकडे खाशा स्वाऱ्या बसायला मंच, अशी ही रचना पंच्याहत्तर हजार लोक बसतील, अशा क्षमतेची आहे.

कुस्ती मैदान १९०७  ते १९१५ ला सव्वा लाख रुपये खर्च करून बांधले. काही कामासाठी सौम्य शिक्षा असलेले कैदी वापरण्यात आले. मैदानाचे उद्‌घाटन गामा पैलवानचा भाऊ इमामबक्ष आणि गुलाब मोहिद्दिन यांच्या कुस्तीने झाले. तत्कालिन खास बागेत या वास्तू उभारल्याने त्याला खासबाग मैदान म्हटले गेले. मात्र नंतर त्यास छत्रपती शाहू कुस्त्यांचे मैदान असे नामकरण केले गेले.
छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत श्रीमंत पिराजीराव घाटगे यांच्या हुकमती खाली ऑक्‍टोबर १९१३ ते ऑक्‍टोबर १९१५ मध्ये पॅलेस थिएटरचे बांधकाम पूर्ण केले. त्याचा आराखडा कागलचे ओव्हरसीअर जिवबा कृष्णाजी चव्हाण यांनी केला. बाळकृष्ण पंडित कंत्राटदाराकडून हे बांधकाम झाले आणि त्याचे उद्‌घाटन युवराज राजाराम छत्रपती महाराजांच्या हस्ते झाले. नंतरच्या काळात पॅलेस थिएटर या नावाचा वारसा बाजूला ठेवून केशवराव भोसले नाट्यगृह असे नाव दिले गेले. केशवराव भोसले हे नटश्रेष्ठ आहेतच. मात्र, काळाच्या ओघात नव्या कलाकारांचे नाव द्यायला प्रशासन वारसा असल्याची फिकीर करणार नाही.

नाट्य गृहाच्या लांबी रुंदीचा विचार केला तर मध्ये कोणताही खांब आडवा न येता त्याचे छत बांधन हे त्या काळात आव्हान होते. परदेशातील नाट्यगृहांचा अभ्यास करून ही उभारणी झाली. माईक, स्पीकरसारखी व्यवस्था नसली तरी व्यासपीठावरील आवाज व्यवस्थित शेवटपर्यंत पोचेल अशी रचना इथे केली गेली. आवाज घुमणार नाही, यासाठी अंतर्भागात लाकडाचे पृष्ठ, रंगमंचाच्या खाली पाण्याचा हौद आणि त्यावर लाकडाचा पृष्ठभाग, दोन्ही बाजूला देखणे, भक्कम, उंच लाकडी खांब, त्या दरम्यान नावाला शोभेल असा पडदा, नाटकाचे प्रत्येक प्रसंग प्रत्यक्षाचा भास घेऊन उभे रहातील, असे पडदे ही एकेकाळी इथली वैशिष्ट्ये ठरली होती. गॅलरीमध्ये लाकडाच्या पायऱ्या होत्या. त्यावरच बसून प्रेक्षक नाटक पाहू शकत. याच गॅलरीला रंगमंचाच्या समोर मोठे आरसे होते. कलाकारांना त्यामध्ये पाहता येत असल्याने चूक रहाण्याचा धोका कमी होत असे. आज हे आरसे काढून टाकले. छत्रपती शाहू महाराजांचे पेंटिंग दर्शनी भागात होते.

१९२० मध्ये कोल्हापुरात वीज आली, तोवर गॅसबत्तीच्या प्रकाशात आणि माईकशिवाय नाटक, संगीत नाटक व्यवस्थित दिसेल आणि ऐकू येईल, अशी रचना हे या वास्तूचे वैशिष्ट्य होते. अलीकडे दुसरा मजला तयार करून बाबूराव पेंढारकर कलादालन सुरू केले. जागेचा वापर झाला असला तरी आपण पेंढारकर यांच्या स्मृतीसाठी नवी वास्तू निर्माण करू शकलो नाही. काळाच्या ओघात नेमकी ही वास्तू कोणाच्या स्मृती दाखल हा प्रश्न पडण्याचा धोका आहे. अलीकडे नाटक, संगीत यामधील गंध नसलेल्या आणि वारसा जपण्याचे भान नसलेल्या अधिकारी आणि आर्किटेक्‍टनी आपले म्हणणे खरे करण्याच्या नादात हे सारे नाहीसे केले. वातानुकूलित करण्याचा अट्टहास थिएटरची रयाच बदलणारा ठरला. टाऊन हॉलसमोर भाऊसिंगजी रोडवरील कमान व फेरीस मार्केटची (आताचे छत्रपती शिवाजी मार्केट) १८७८-१८८२ दरम्यान बांधलेली कमान उतरवून सध्या त्याची पुनर्रचना नाट्यगृहाची प्रवेशद्वार म्हणून करण्यात आली. त्या कामाचे उद्‌घाटन १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. परिसरात आज शाहीर पिराजी सरनाईक, अरुण सरनाईक असे पुतळे उभे केले आहेत. फेरीवाल्यांचा गराडा या वारसास्थळाला पडला आहे. 

आता तरी तशी चूक करू नये
व्यवस्थापन, स्वच्छता, देखरेख आणि वारसा जपण्याबाबत अनास्था, यामुळे वास्तू निशब्द अवस्थेत सारं सोसताना दिसते. बदल करताना काय करू नये, हे इथं अनुभवायला आलं आहे. आता तरी अशी चूक वारसा वास्तूबाबत करू नये, एवढं शहाणपण महापालिकेला यावं, ही अपेक्षा आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Palace Theater and Wrestling Ground heritage story by uday gaikwad