कोल्हापुरकरांच्या ‘प्लेग’च्या कटू आठवणी ताज्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

साथीच्या काळात काही दिवसासाठी घरे सोडून जाण्याची वेळ आली तर लोकांच्या घरातील सोने-नाणे पैसे कागदपत्रे याचे सीलबंद बॉक्‍स संस्थांच्या खजिन्यात सुरक्षित ठेवून घेण्याची ग्वाहीही शाहू महाराजांनी त्या काळात दिल्याची महत्त्वाची नोंद आहे. १९०० ला कोल्हापुरात प्लेगची साथ आली होती, देशभरातही प्लेगने हाहाकार उडवून दिला होता. ही साथ इतकी सांसर्गिक होती, की बघता बघता एखाद्याच्या शरीरावर, काखेत गाठ उठायची व उपचार करेपर्यंत त्या रुग्णाची गाठ मृत्यूशी पडायची.  

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजना काहींना अडचणीच्या वाटू लागल्या असल्या तरी त्या आता अपरिहार्यच ठरणार आहेत. किंबहुना सक्ती करून या उपाययोजना राबवाव्या लागणारच. हे स्पष्ट झाले आहे. 

१९०० मध्ये कोल्हापुरात आलेल्या प्लेगच्या साथीवेळी खुद्द शाहू महाराजांनी अगदी दंडापासून ते जप्तीसारख्या कडक कारवाईचे आदेश काढून उपाययोजना राबवल्याचा इतिहास कोरोनाच्या निमित्ताने १२० वर्षांनी पुन्हा चर्चेत आला आहे. 

किंबहुना साथीच्या काळात काही दिवसासाठी घरे सोडून जाण्याची वेळ आली तर लोकांच्या घरातील सोने-नाणे पैसे कागदपत्रे याचे सीलबंद बॉक्‍स संस्थांच्या खजिन्यात सुरक्षित ठेवून घेण्याची ग्वाहीही शाहू महाराजांनी त्या काळात दिल्याची महत्त्वाची नोंद आहे. १९०० ला कोल्हापुरात प्लेगची साथ आली होती, देशभरातही प्लेगने हाहाकार उडवून दिला होता. ही साथ इतकी सांसर्गिक होती, की बघता बघता एखाद्याच्या शरीरावर, काखेत गाठ उठायची व उपचार करेपर्यंत त्या रुग्णाची गाठ मृत्यूशी पडायची. मृत्यू झाल्यावर दहनासाठी लाकूड शोणीची सोय मृताच्या नातेवाईकांना करायला लागायची. मृताचे प्रमाण वाढल्याने दहनासाठी पुरेशी लाकडे आणि शेणी मिळत नसायची. 
एकाला घाटावर पोचवायचे आणि परत आली की दुसऱ्याला पोहोचवायचे असे मृत्यूचे प्रमाण होते.

हे पण वाचा - इचलकरंजी ब्रेकिंग - शिरोळ तालुक्यात सापडला कोरोना संशयित रुग्ण....

या काळात राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या. पहिली महत्वाची उपाययोजना म्हणजे त्यांनी कोटाच्या आत म्हणजे बिंदू चौक, शिवाजी चौक, गंगावेश, वरुणतीर्थ, मंगळवार पेठ या तटबंदीच्या आत राहणाऱ्या लोकांना गावाबाहेर हलवले. शहराच्या बाहेर खुल्या माळावर झोपड्या किंवा तात्पुरत्या वसाहती उभ्या करून तेथे लोकांना सक्तीने राहायला लावले. जेणेकरून गावात उंदरांमुळे होणारा प्लेगचा प्रादूर्भाव कमी झाला. हे करताना त्यांनी गावातील सर्व उद्योग व्यापार बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्या लोकांना पैसे सोने-नाणे सोबत घेऊन बाहेर राहणे सुरक्षीत वाटत नाही त्यांनी आपले दागिने पैसे सीलबंद बॉक्‍स करून संस्थांनच्या खजिन्यात ठेवाव्यात असे आवाहन केले. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी चोरून किंवा अडेलतट्टूपणा करून कोणी गावात राहण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई सुरू केली. सरकारी हुकूम मोडल्याबद्दल गुन्हेही दाखल केले.

गावातील लोक माळावर तात्पुरत्या निवाऱ्यासाठी राहायला गेल्यावर लोकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी शाहू महाराजांनी पोलिसांची रात्रभर गस्त ठेवली. ज्यांना स्वखर्चाने निवारा बांधता येणार नाही अशांसाठी लाकूड, गवत, खिळे, मोळे हे साहित्य संस्थांनतर्फे मोफत दिले, मात्र लोकांना साथीच्या काळात घरे सोडून तात्पुरत्या निवाऱ्यासाठी राहणेच त्यांनी सक्तीने 
भाग पाडले.

हे पण वाचा -  संचारबंदीतही या माय लेकांची सुरू आहे घरपोच भाजी विक्री... 

केवळ एवढ्यावरच शाहू महाराज थांबले नाहीत तर त्यांनी साथीचा प्रादूर्भाव ओसरल्यावर गावातील घरे निर्जंतूक करून घेण्याची मोहीम उघडली. ज्याचे त्याने आपल्या खर्चाने घर निर्जंतुकीकरण करून घ्यायचे. घर निर्जंतुकीकरण करून घेतल्याचा आरोग्य अधिकाऱ्याचा दाखला घेऊनच घरी परत राहायला यायचे. आणि व्यापाऱ्यांनीही तसे दाखले घेऊनच आपली दुकाने उघडायची अशी सक्ती केली. घर निर्जंतुकीकरण करण्याचा खर्च ज्याला परवडणार नाही, त्याचा खर्च संस्थांनच्या वतीने करून तो खर्च घरफाळ यातून वसूल करण्याचीही तरतूद केली.

या साऱ्या खबरदारीच्या पण सक्तीच्या उपाययोजनांमुळे १९०० ला कोल्हापुरातील प्लेगची साथ आटोक्‍यात आली होती. 

आता कोरोनाची साथ कोल्हापुरात नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून काही सक्तीच्या उपाययोजना चालू झाल्या आहेत आणि त्या कशा आवश्‍यक आहेत हे १९०० च्या कोल्हापुरातील प्लेगच्या साथीत यावेळी खुद्द शाहू महाराजांनीच राबवल्या आहेत. आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur people Memories of the plague corona virus