कोल्हापूरची पोर ब्रिलियंटच : "सी.ए'मध्ये यशस्वी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

ओंकार धर्माधिकारी 
Thursday, 18 February 2021

पूर्वी सी.ए झाल्यावर स्वतःची प्रॅक्‍टीस हा एवढाच पर्याय होता. फार कमी विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत होती. मात्र आता

कोल्हापूर :  अत्यंत कठीण असणाऱ्या सी.ए. (चार्टड अकौंटंट) परीक्षेमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोचिंग क्‍लासची सुविधा, पर्याप्त साधने उपलब्ध असल्यामुळे चार वर्षात जिल्ह्यातून सी.ए.परीक्षा यशस्वी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

पूर्वी दहावीला 80 टक्केपेक्षा जास्त गूण मिळवणारे बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेकडे जायचे. 12 वीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा. डॉक्‍टर, इंजिनिअर व्हायचे. करिअरचा हा एक मार्ग ठरलेला असायचा. दहावीत 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेले मोजकेच विद्यार्थी कॉमर्स शाखेकडे जायचे. त्यातीलही फार कमी विद्यार्थी सी.ए. परीक्षा द्यायचे. पूर्वी कोल्हापुरात फारसे कोचिंग क्‍लास नव्हते.

"सी.ए'मध्ये कोल्हापूरचा टक्का वाढला 

अभ्यासाचा फारशी साधने नव्हती. त्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही कमी होते. जिल्ह्यातील एकूणच औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती मर्यादीत होती. त्यामुळे सी.ए.ची आवश्‍यकताही कमी होती. पण गेल्या काही वर्षात परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. कॉमर्समधील करीअरच्या संधी वाढल्या आहेत. सी.ए, सी.एस यांची गरज वाढली. जी.एस.टी नंतर तर सी.ए.च्या कामातही वाढ झाली आहे. यावर्षी अकरावीमध्ये कॉमर्स इंग्रजी माध्यमाचा कटऍफ 89 ते 93 टक्‍क्‍यांपर्यंत गेला होता. यावरून चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल कॉमर्सकडे वाढल्याचे लक्षात येते. 

पूर्वी सी.ए.परीक्षेचे कोचिंग क्‍लासेस केवळ पुणे, मुंबई येथेच होते आता कोल्हापुरातही चांगले कोचिंग क्‍लास सुरू झाले आहेत. स्टडी मटेरियल उपल्ब्ध आहे. इंटरनेटवरही सी.ए.परीक्षेबाबतची पुस्तके व अन्य साहित्य आहे. या सर्व परिस्थितीमुळे सी.ए.परीक्षेतची काठिण्यपातळी जरी कमी झाली नसली तरी उत्तिर्ण होण्याऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

पूर्वी सी.ए झाल्यावर स्वतःची प्रॅक्‍टीस हा एवढाच पर्याय होता. फार कमी विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर या मोठ्या शहरात बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या वाढली. त्यामुळे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगले वेतन देणाऱ्या नोकऱ्या मिळू लागल्या. कोचिंग क्‍लासच्या उपलब्धतेमुळे सी.ए.परीक्षा देणाऱ्यांची आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. 
- अभिजीत कुलकर्णी, संचालक, ब्रिलियंट प्रोफेशनल ऍकॅडमी 

वर्ष*उत्तिर्ण विद्यार्थी संख्या (जिल्ह्यातील) 
मे 2017*21 
नोव्हेंबर 2017*18 
मे 2018*14 
नोव्हेंबर 2018*26 
मे 2019*30 
नोव्हेंबर 2019*27 
नोव्हेंबर 2020*31  

 संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur percentage increase in CA education marathi news