चिप्स खाल्याने रंकाळ्यातील पाणबदकांचा मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

रंकाळा तलावात शाहू स्मृती उद्यानालगत शुक्रवारी दोन बदकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते

कोल्हापूर - रंकाळा तलावातील पाणबदकांचा मृत्यू कुरकुरे तसेच चिप्स खाल्ल्याने झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. दोन बदकांसह कबूतर, तीन कावळे यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने आज निवेदनाद्वारे दिली आहे.

रंकाळा तलावात शाहू स्मृती उद्यानालगत शुक्रवारी दोन बदकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. सरनाईक कॉलनीत एक कबूतर मृतावस्थेत आढळले होते. गडहिंग्लज पालिका क्षेत्रात दोन कावळे, मौजे तुर्केवाडी (ता. चंदगड) 
येथे एका कावळ्याचा मृत्यू झाला. पक्षांचे नमुने पुणे व व भोपाळ येथे पाठविले जातात. रोगनिदानासाठी औंध (पुणे) येथे विभागीय रोग अन्वेषण विभागाकडे पक्षी पाठविले गेले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी मृत पक्षी आढळून आले. तेथे सतर्क क्षेत्र जाहीर करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. वन्य पक्षी, कावळे व कोंबड्याच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लूबाबत धास्ती होती; मात्र कोल्हापुरात आढळलेल्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेला नाही, हे ही स्पष्ट झाले.

पाणबदकांचे शवविच्छेदन करणाऱ्या शास्त्रज्ञास विचारणा केली असता पानबदकांचा मृत्यू हा कुरकुरे व चिप्स खाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. के. पवार व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय ए. पठाण यांनी यासंदर्भातील पत्रकात म्हटले आहे.

कुरकुरे आणि चिप्स खाल्याने बदकांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आल्याने पक्षीप्रेमीत अस्वस्थता पसरली आहे. रंकाळा तलाव परिसरात स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. पाणकोंबड्याचा मोठा वावर असतो. अन्न पदार्थाच्या निमित्ताने पक्षी पाण्याच्या कडेला येतात. शिळे अन्न, खराब कुरकुरे किंवा  चिप्सची पाकिटे टाकून देण्याचा काहींना सवय असते. नेमकी या बदकांनी कुरकुरे तसेच चिप्स खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला. 
 
पाणवठ्यांच्या ठिकाणी दररोज फेरफटका मारणारे किंवा पर्यटकांनी हौसेपोटी पक्षांना कुरकुरे किंवा चिप्स खाण्यासाठी टाकू नयेत. रिकामी पाकीटेही कचरा पेटीमध्ये टाकावीत. रंकाळा तलावाच्या ठिकाणी कुरकुरे आणि चिप्प्स खाल्याने पक्षांचा मृत्यू होणे ही बाब दुर्देवी आहे. पोल्ट्री फॉर्म असणाऱ्यांनी एक लीटरमध्ये पाण्यामध्ये धुण्याचा सोडा मिसळून तो फवारावा. त्यामुळे पोल्ट्रीचा परिसर निर्जुंतक होईल आणि बर्ड फ्लूचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होईल.
-डॉ. व्ही. के. पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur rankala bird