"काळभैरी' वादात "एस.पीं'ची मध्यस्थी

अजित माद्याळे
Saturday, 1 February 2020

महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या यात्रा नियोजनसंदर्भात स्थानिक देवस्थान उपसल्लागार समिती, मंदिराचे गुरव आणि मानकऱ्यांत सुरू असलेल्या वादात जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी आज मध्यस्थी केली. उपसल्लागार समितीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेचे नियोजन दिले असून त्यांनी गुरव व मानकऱ्यांतील प्रतिनिधींना उपसमितीत घेऊन यात्रा शांततेत पार पाडायची आहे, असे डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

गडहिंग्लज : महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या यात्रा नियोजनसंदर्भात स्थानिक देवस्थान उपसल्लागार समिती, मंदिराचे गुरव आणि मानकऱ्यांत सुरू असलेल्या वादात जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी आज मध्यस्थी केली. उपसल्लागार समितीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेचे नियोजन दिले असून त्यांनी गुरव व मानकऱ्यांतील प्रतिनिधींना उपसमितीत घेऊन यात्रा शांततेत पार पाडायची आहे, असे डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, ""देवस्थान समितीच्या अधिपत्याखालील स्थानिक देवस्थान उपसल्लागार समिती आणि गुरव-मानकऱ्यांमध्ये काही मुद्यावरून वाद न्यायप्रवीष्ठ आहे; परंतु, यंदाच्या यात्रा नियोजनाबाबत मतभेद होते. आज यासंदर्भात सर्व घटकांची बैठक घेतली. दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची तपासणी केली. कोणताही वाद असला तरी त्याचे पडसाद यात्रेत उमटू नयेत,

यात्रा शांततेत पार पडावी या हेतूने संबंधित सर्वांनाच मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे. 2002 पासून उपसमितीकडेच यात्रेचे नियोजन आहे. यामुळे यंदाची यात्राही त्यांच्या नियोजनाप्रमाणे होईल; परंतु या समितीत गुरव व मानकऱ्यांचा प्रतिनिधी घेण्याची अपेक्षा संबंधित घटकांनी केली आहे. त्यानुसार उपसमितीत या प्रतिनिधींना घेऊन यात्रा शांततेत पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. सर्वांनी मिळून यात्रेचे नियोजन करण्यावर बैठकीत एकमत झाले आहे. यात्रा काळात वाद उफाळू देऊ नका, तसेच भाविकांच्या सुविधांमध्ये कोणत्याही त्रुटी चालणार नाहीत, असेही त्यांना सांगितले आहे.'' 

गुलाल उधळणाऱ्यांवर नजर 
अलीकडे मिरवणुकीत गुलालाची उधळण होत आहे. तरुणाईच्या हुल्लडबाजीला कंटाळून महिला भाविकांची संख्या पालखी मिरवणुकीत कमी होऊ लागली आहे. यामुळे यंद मिरवणुकीत गुलालाचा वापर होऊ नये, यासाठी विक्रेत्यांची बैठक घेतली जाईल. गुलाल विक्रीवर निर्बंध आणले जातील. मोठमोठे गोंडे लावून वाहने मिरवणुकीत आणणे, वाद्य व नृत्याच्या नादात पालखीला पुढे जाऊ न देणे आदी प्रकारांवरही करडी नजर राहील, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur s p mediate kalbhiry dispute Kolhapur Marathi News