अभियानापुरती नको, वर्षभर जनजागृती करा; पालकमंत्री सतेज पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

जनजागृतीसाठी पोस्टर गॅलरी, चित्र भिंती यांच्या माध्यमातून आज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला

कोल्हापूर : वाहतूक पंधरवड्यात जर अपघात कमी होत असतील तर वर्षभरात जादा का होतात? याचा अभ्यास करा आणि सप्ताह, पंधरावड्यापुरती नको वर्षभर वाहतुक नियमांची जनजागृतीचे करा, अशा सूचना पालकमंत्री आणि परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या. 

32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिस दलाच्या वतीने संयुक्त कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव प्रमुख उपस्थित होते. 

जनजागृतीसाठी पोस्टर गॅलरी, चित्र भिंती यांच्या माध्यमातून आज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मोटार ट्रेनिंग स्कूलवतीने आयोजित रॅलीचे उद्‌घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. एक महिने अभियान चालणार आहे. कार्यक्रमात वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेवून नियमांच्या पुस्तकाचे प्रकाशनही केले. 

मंत्री पाटील म्हणाले,"" ब्लॅक स्पॉट कमी करा, शासन म्हणून जे जे देता येईल ते देत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ब्लॅक स्पॉट कमी करण्यासंदर्भात आढावा घेतला पाहिजे. यातून पुढील वर्षी नक्कीच अपघातांची संख्या त्यातील मृतांची संख्या कमी होईल'' 
खासदार संजय मंडलिक यांनी सातारा कागल सहापदरी रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करू, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात वाहतूक पार्क उभा करू करू, वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या वाहनांची संख्या वाढवू, विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करू,असेही जाहीर केले. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ वाहनांचा वेग अपघाताचे कारण नसून वाहन चालवण्याची पद्धत हे महत्त्वाचे कारण असल्याचे स्पष्ट केले. वाहन चालक प्रशिक्षण कडक केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. 

पोलीस अधिक्षक बलकवडे यांनी वर्षाभरात 313 जण अपघात मृत्यू झाल्याचे सांगून ब्लॅक स्पॉट कमी करण्याबरोबरच नियमांची जनजागृती केली पाहिजे असे स्पष्ट केले. 

डॉ.अल्वारिस यांनी ओव्हरटेक, ओव्हरलोड, ओव्हर स्पीड आणि ओव्हर कॉन्फिडन्स या गोष्टीमुळे अपघातत्‌ वाढत होत आहे. याबाबत जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
  
अपघातांची संख्या आणि इतर माहिती घेऊन अभ्यास करा, अपघाताची कारणे, वयोगट शोधा आणि अपघात कमी करण्यावर भर द्या. हा अभ्यास किती दिवसात करणार अशीही विचारणा मंत्री पाटील यांनी व्यासपीठावरूनच डॉ.अल्वारिस आणि श्री.बलकवडे यांना केली. यावर दहा दिवसात हा अहवाल तयार करू असे त्यांनी सांगितले. 
  
महामार्गावरील पोलीस मदत केंद्रांना वाहनांची कागदपत्रे तपासण्याचे अधिकार देऊ नयेत, त्यातून त्रास होत असल्याचे श्री. जाधव यांनी सांगून इतर तक्रारी केल्या. मंत्री पाटील यांनी तक्रारींचा विचार करू असे सांगून राष्ट्रीय महामार्ग पोलिसांपासून वेगळा करून तो परिवहन विभागाकडे ठेवण्याचाही विचार करूया, यातून महामार्गावर बदली मागणाऱ्यांचे प्रमाणही कमी होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगताच एकच हश्‍शा पिकला. 
 
मोरेवाडीतील चाचणी ट्रॅक साठी तेरा कोटी रुपये मंजूर केले आहेत, लवकरच हा ट्रॅक सुद्धा अत्याधुनिक होईल होईल. राज्यातील अकरा जिल्ह्यातील परिवहन खात्यातील ट्रॅक्‌ साठी 136 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असेही मंत्री पाटील यांनी येथे जाहीर केले. 
 
राज्य मार्गावरील अपघात 24 टक्के 
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात 35 टक्के 
वर्षाला साडेचार लाख अपघात 
वर्षाला सुमारे दीडलाख जणांचा अपघाती मृत्यू 
24 तासांत 414 मृत्यू 
तासाला 17 जणांचा मृत्यू 
जिल्ह्यात वर्षात 313 अपघाती मृत्यू 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur satej Inauguration of 32nd National Road Safety Campaign