कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वनसंरक्षण कार्यात तीन पदके

शिवाजी यादव 
Thursday, 26 November 2020

उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील 30 जिगरबाज वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना वन विभागातर्फे सुवर्ण व रजतपदके जाहीर झाली आहेत

कोल्हापूर - राज्यातील वन व वन्यजीव संरक्षण, वन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील 30 जिगरबाज वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना वन विभागातर्फे सुवर्ण व रजतपदके जाहीर झाली आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक विभागात पाटणे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील वनपाल दत्ता हरी पाटील यांना सुवर्णपदक, वाई (जि. सातारा) रेंजचे वनक्षेत्रपाल महेश सुरेश झांजुर्णे यांना रजतपदक; तर कोल्हापुरातील वनरक्षक रामदास दत्तात्रय खोत यांना सुवर्णपदक जाहीर झाले.
 
निसर्गसंपदेचे संरक्षण करणे, वन गुन्हेगारी रोखणे, वन्यजीव रक्षण करणे, त्यासाठी तांत्रिक युक्‍त्यांचा अवलंब करणे, शोधकार्य करणे, अशी कामे वरील तिन्ही पदांवरील अधिकाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून केली आहेत. त्याची दखल घेऊन वन विभागाने पदके जाहीर केली. कोल्हापूर प्रादेशिक वन कार्यालयाकडून कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांत वन विभागात उत्कृष्ट काम केलेल्या वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे पदकासाठी राज्यस्तरीय समितीला पाठवण्यात आली होती. 

वनपाल दत्ता पाटील (पाटणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) ः कोल्हापुरात येणाऱ्या हत्तींचे मार्ग शोधून काढले. हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हत्तीला कुटुंबाची उपमा देऊन त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तसेच, वन्यजीव व वनांचे मानवी जगण्यात असलेले महत्त्व याबाबत शाळा, महाविद्यालयांत प्रबोधन केले. प्रभारी वनक्षेत्रपाल म्हणून वन्यजीवांवरील हल्ले रोखण्यासाठी तांत्रिक साधनांचा यथायोग्य वापर केला. 

हे पण वाचामहापालिकेच्या निवडणुकीत गटबाजी संपवून  विधानसभेच्या पराभवाचे उट्टे शिवसेना काढणार का? 

वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे (वाई, जि. सातारा) ः जंगल हद्दीत वणवे व शिकारी आटोक्‍यात आणल्या. वणवे लावणारे आरोपी सहजासहजी सापडत नाहीत. मात्र, श्री. झांजुर्णे यांनी वणवे लावणाऱ्या 50 पेक्षा अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले. त्यांना शिक्षाही झाल्या आहेत. 

वनरक्षक रामदास खोत (कोल्हापूर) ः 14 वर्षांच्या सेवेत शेकडो वन्यजीवांना जीवदान देण्यात ते यशस्वी झाले; तर काही हिंस्त्र वन्यजीवांना पकडण्याच्या मोहिमेत त्यांचा सहभाग आहे. ते चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील रहिवासी आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur won three medals in forest conservation