कोल्हापूर जिल्हा परिषदेतून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 13 लाख

सदानंद पाटील
Thursday, 14 January 2021

मात्र नेमके कोणत्या इमारतीसाठी याचा वापर होणार आहे, हे मात्र अजुन निश्‍चित करण्यात आलेले नाही. 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेला प्राप्त 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यातील रक्‍कम सत्ताधारी व विरोधी सदस्य यांना वितरित करण्यात आली आहे. यातील काही रक्‍कम ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विकासकामासाठी राखीव ठेवली आहे. तर 13 लाख रुपये हे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र नेमके कोणत्या इमारतीसाठी याचा वापर होणार आहे, हे मात्र अजुन निश्‍चित करण्यात आलेले नाही. 

जिल्हा परिषदेला 15 व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र याच्या वाटपावरुन वाद सुरु आहे. निधीचे असमान वाटप झाले असल्याने माजी महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचा निकाल अजुन लागलेली नाही. तोपर्यंत पदाधिकाऱ्यांनी निधीचे वाटप केलेले आहे. हे वाटप करत असताना विरोधी 8 सदस्यांचा निधीही वितरित केला आहे. त्यामुळे ज्या सदस्यांना निधी मिळालेला नाही त्यांनी याबाबत तक्रार केली आहे.

हेही वाचा - मोबाईलचा कोण आणि कशा पद्धतीने वापर करणार होते ? या साऱ्या प्रश्‍नांचा उलगडा होणार

काही पदाधिकाऱ्यांनी मात्र त्यांना देण्यात आलेला निधी वगळून इतर सदस्यांच्या निधीही त्यांनी खर्च केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 85 लाख, 41 लाख तसेच 38 लाखांचा निधी आपल्या मतदार संघात नेला आहे. एका बाजुला सदस्यांना निधी नसताना 13 लाखांची रक्‍कम रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ठेवली आहे. मात्र कोणत्या ठिकाणी हे काम होणार आहे याची कोणतीच माहिती नाही.

कारण मुख्य इमारतीस यापुर्वीच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. तर अनेक पंचायत समित्यांचे बांधकाम गेल्या 10 वर्षात झाले आहे. त्याठिकाणीही इमारत बांधकाम होत असताना ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या निधीवरुन वाद सुरु आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from kolhapur zilha parishad 13 lakh rupees budget declared for building in kolhapur