मरण स्वस्त झाले..... माणुसकीही थिजली!

Kolhapur`s trader died alone in Mumbai ...then what happened?  kolhapur Marathi news
Kolhapur`s trader died alone in Mumbai ...then what happened? kolhapur Marathi news

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गात मरण स्वस्त झाले आणि माणुसकीही थिजली असा दाहक अनुभव कोल्हापुरातील एका कुटुंबाला आला आहे. गोकुळ शिरगावातील व्यापारी अरविंद जाधव यांना दादर (मुंबई) मध्ये असताना धाप लागली. खासगी दवाखान्याच्या परिसरात रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झाला. चार तासांनी पोलिस त्यांना रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. तेथून पत्नी अर्चना आणि मुलगा ऋतुराज यांना कळविले. पुढे काय करायचे, या विचारात ते दोघे असतानाच पहाटे जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा निरोप पोलिसांनी दिला. 

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कारण पोलिस देत असले तरीही त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अहवाल नातेवाइकांना मंगळवारी पोलिसांकडूनच मिळाला आहे. त्यांना न्यूमोनिया झाला होता; पण कोरोना नाही. त्यामुळे अनेक प्रश्‍न अनुत्तरितच आहेत. लॉकडाउनमुळे एका कुटुंबीयांवर अशीही परिस्थिती येऊ शकते, हे कल्पनेच्या पलीकडे आहे. 

सहा महिन्यांहून अधिक काळ बंगळूर, पुणे, मुंबई येथे व्यापारासाठी गेलेले अरविंद मल्हार जाधव (वय 65, रा. महालक्ष्मी कॉलनी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर) मुंबईतून 22 एप्रिलनंतर कोल्हापुरात येणार होते. लॉकडाउनमुळे दादर येथील एका लॉजमध्ये राहिले. तेथे मालक आणि जाधव यांच्यासोबतच नाईलाज म्हणून राहिलेले कुलकर्णी एकत्रित होते. शासनाकडून येणारा कोरडा भात ते खात होते. धाप लागत असल्यामुळे त्यांना ते खाल्ले जात नव्हते. याबाबतची माहिती त्यांनी फोनवरून मुलाला दिली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी विक्रोळी येथील त्यांच्या नातेवाइकांकडे जाण्याचा सल्ला दिला होता; मात्र लॉकडाउनमुळे ते जाऊ शकत नव्हते.

काही दिवसांत त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. चार दिवसांपूर्वी सायंकाळी ते खासगी रुग्णालयात गेले. तेथे उपचार झाले नाहीत. त्यामुळे रस्त्याकडेलाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशातील पत्त्यावरून ते कोल्हापूरचे असल्याचे समजले. पोलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना रात्री उशिरा दिली. पुढे काय करायचे, या चिंतेत पत्नी आणि मुलगा होता. 

दरम्यान, पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती तेथील पोलिसांनी कुटुंबीयांना दिली. त्यांना कोरोना झाल्याचे कारण दिले. चार दिवसांनी आज त्यांच्या मृत्यूचे कारण असलेला दाखला पोलिसांनी त्यांच्या मुलाकडे व्हॉटस्‌ ऍपवर पाठवला. त्यामध्ये नैसर्गिक मृत्यू असे म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. 

अनेक प्रश्‍नांच्या भोवऱ्यात 
शवविच्छेदन झाले की नाही, स्वॅब कधी घेतले, मृत्यू कारण दाखल्यावर "कोविड 19'चा उल्लेख का नाही, असे अनेक प्रश्‍न पत्नी आणि मुलाला पडले आहेत. याचे उत्तर कोण देणार? राजस्थानमध्ये मृत्यू झाल्यानंतर लॉकडाउनमध्येही पार्थिव कोल्हापुरात येऊ शकते; मग मुंबईतून का आणता आले नाही?, जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री याकडे लक्ष देणार काय? मृत्यूची चौकशी होणार काय? सरकारकडून नुकसानभरपाई मिळणार काय, अशा अनेक प्रश्‍नांच्या भोवऱ्यात त्यांची पत्नी आणि मुलगा आहे. 


आई अर्चना कापड दुकानात लेखापाल आहेत. लॉकडाउनमुळे पगार नाही. पुढे चार महिने पगार होतील की नाही, याची खात्री नाही. मी सी.ए. अभ्यासक्रम शिकतो. माझ्याकडे आर्थिक स्त्रोत नाही. व्यापारासाठी गेलेले वडील सहा महिन्यांनी घरी येणार होते. आता तेही आलेले नाहीत. मृत्यूची चौकशी व्हावी, पण आता लढण्याची आमची परिस्थिती नाही. 
- ऋतुराज जाधव, मृत व्यापाऱ्याचा मुलगा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com