कोल्हापूरमधील शिक्षकांची उद्यापासून होणार कोविड चाचणी

सुनील. स. पाटील
Wednesday, 18 November 2020

कोरोनाच्या संसर्गानंतर शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर हळूहळू अनलॉकच्या प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले

वडणगे (कोल्हापूर)- शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश पारीत केला आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाच्यावतीने नियोजनाची लगबग सुरू आहे. लॉकडाऊननंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील तीन हजार माध्यामिक शिक्षकांसह साडेतीन हजार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची उद्या( ता.19) पासून आरोग्य विभागाकडून मोफत कोवीड चाचणी केली जाणार आहे. ज्या त्या तालुकास्तरावरील कोवीड सेंटरमध्ये किंवा शिक्षक स्वच्छेने खासगी प्रयोग शाळेत ही चाचणी करू शकणार आहेत.

कोरोनाच्या संसर्गानंतर शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर हळूहळू अनलॉकच्या प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. पाडव्याच्या मुहूर्तावर देवालये उघडण्यात आली. त्यानंतर आता 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी 17 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकाच्या आयुक्तांना कोवीडबाबतच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षकांची मोफत कोवीड चाचणी केली जाणार आहे.
जिल्हयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्‍यांची उद्या (ता. 19)पासून ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणच्या कोवीड सेंटरमध्ये कोवीड चाचणी केला जाणार आहे. 23 नोव्हेंबरपूर्वी ही चाचणी प्रक्रिया पूर्ण केेली जाणार असून प्राथमिक शिक्षकांना 30 नोव्हेंबर पर्यत कोवीड चाचणी करून प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अहवाल द्यावा लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मोफत कोवीड चाचणी केली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिक विभागाचे तीन हजार शिक्षक तर साडेतीन हजार शिक्षकेतर कर्मचारी आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने ही कोवीड चाचणी घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक राहणार आहे. 
-किरण लोहार, शिक्षणाधिकारी माध्यमिक .जि.प

हे पण वाचाकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य  

अशी घ्यावी लागणार काळजी
 शाळांचे सर्व वर्ग खुले करून स्वच्छ करावे लागणार आहेत. पडझड झालेल्या शाळांची किरकोळ दुरूस्ती करावी लागेल. शाळांचे सॅनिटायझरिंग करणे, स्वच्छता गृहे स्वच्छ करणे, विदयार्थ्याना हात धुण्यासाठी साबण,हॅन्डवॉशची पुरेशा प्रमाणात सोय करणे वर्ग घेताना सुरक्षित अंतर राखणे तसेच कोवीड बाबत जनजागृती करावी लागणार आहे थर्मल गणच्या साहाय्याने विदयार्थ्याचे तापमान मोजण्याबरोबरच ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेव्हल ही पाहावी लागणार आहे 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid test for teachers in Kolhapur will be held from tomorrow