कुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार 

kusti hech jivan wrestling facbook page created by ramdas desai kolhapur
kusti hech jivan wrestling facbook page created by ramdas desai kolhapur

कोल्हापूर - पैलवानकीचे स्वप्न उराशी घेऊन अनेक जण तांबडी माती अंगाशी लावतात, मैदाने रंगू लागतात. पण, अनेकांना ही रंगत सुरू होताच गरिबीमुळे रामराम ठोकावा लागतो. असंच काहीसं घडलं बानगे (ता. कागल) येथील पैलवान रामदास देसाई याच्याबाबत. 10 वर्षांपूर्वी कुस्ती सुटली; पण रामदासचा जीव मात्र कुस्तीतून सुटला नाही. तांबड्या मातीची सेवा व्हावी, कोल्हापूरची कुस्ती वाढावी, ती जगभरात पोचावी, यासाठी रामदासने सोशल मीडियाचा आधार घेत तीन वर्षांपूर्वी "कुस्ती हेच जीवन' हे फेसबुक पेज काढले आणि त्याद्वारे कुस्तीचा यशस्वी प्रचार सुरू केला, त्याला अल्पावधीतच प्रतिसाद मिळाला. 

रामदास राष्ट्रकुल विजेते राम सारंग यांच्याकडे सरावाला. घरची गरिबी असल्याने खुराकाला पैसा नाही. मोठ्या मल्लांचा स्वयंपाकी बनून कुस्तीचा सराव सुरू होता. चमक दाखविल्याने शाहू कारखान्याने 10 वर्षे मानधनधारक मल्ल म्हणून सांभाळले. पुढे घरची जबाबदारी अंगावर पडली अन्‌ रामदास घरी परतला. 10 वर्षे तो खासगी कंपनीत काम करीत आहे. मात्र, कुस्तीची त्याची ओढ कायम होती. 

जुन्या मल्लांची छायाचित्रे, गाजलेल्या लढतींचा इतिहास, मल्लांची माहिती देणारे लेख, खुराक कसा असावा, राज्यात होणाऱ्या कुस्ती मैदानांची माहिती फेसबुक पेजच्या माध्यमातून द्यायला सुरवात केली. कोल्हापूरच्या कुस्तीला यातून प्रसिद्धी देण्याचाही यातून विशेष प्रयत्न केला गेला. 

यू ट्यूब, इन्स्ट्राग्रामवरही प्रचार 

फेसबुक पेजनंतर यू ट्यूब, व्हॉट्‌सऍप, इन्स्ट्राग्राम या समाजमाध्यमांवर कुस्तीचा प्रचार रामदास वेगाने करीत आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध कुस्ती स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करीत घरोघरी प्रत्येकाच्या मोबाईलवर कुस्ती पोचविण्याचे काम निःस्वार्थीपणे तो करीत आहे. 

एक लाख लोक जोडले 

'कुस्ती हेच जीवन' सोशल मीडिया प्रयोगाशी जवळपास एक लाख लोक जोडले आहेत. कुस्ती शौकिनांचा वाढता प्रतिसाद पाहता या मोहिमेचे चळवळीत रूपांतर झाले. रामदासने संघटन बांधत महाराष्ट्रातील मल्ल व कुस्ती शौकिन यात सामाविष्ट करून घेतले. या माध्यमातून कुस्ती स्पर्धा, तसेच गरजूंना मदतही करण्यात येत आहे. लॉकडाउन काळात फेसबुकद्वारे जवळपास 150 मल्ल, वस्ताद, अभ्यासकांच्या लाईव्ह मुलाखती, अभ्यास वर्ग घेतले. 

नोकरीची गरज...

लॉकडाउन काळात रामदास नाशिकमध्ये खासगी कंपनीत काम करीत होता. नोकरी सांभाळत त्याचा कुस्तीचा प्रसार सुरू होता. पण, कोरोनामुळे नोकरीतील अनिश्‍चितता वाढली आहे. महिनाभरापासून तो गावीच आहे. जिल्ह्यात नोकरी मिळाली तर इथेच राहत त्याला कुस्तीची सेवा करता येईल. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com