गडहिंग्लजला पाटबंधारे विभागात समन्वयाचा "दुष्काळ'

Lacks Coordination In The Irrigation Department In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Lacks Coordination In The Irrigation Department In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : चित्री प्रकल्पामुळे बारमाही पाणीदार झालेल्या हिरण्यकेशी नदीकाठाला पाटबंधारे विभागातील समन्वयाच्या दुष्काळाचा फटका बसत आहे. चित्रीच्या दुसऱ्या आवर्तनात आजरा तालुक्‍यातील बंधारे तीन मीटरने फुल्ल करून उर्वरित पाणी सोडल्याने आजऱ्याच्या पूर्व भागातील (गडहिंग्लज तालुका) लाभक्षेत्रातील गावांना पाणी कमी मिळत आहे; परंतु अधिक उपसामुळे पाणी कमी पडत असल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने अचानक उपसाबंदी लागू केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. 

चित्रीतून पाणी सोडल्यानंतर अधिकाधिक 15 दिवसांच्या आत ते खोत बंधाऱ्याला पोहोचते. दुसरे आवर्तन 12 मार्च रोजी सोडले असून 23 दिवस उलटले तरी पाणी पोहचलेले नाही. सध्या नदीपात्रात एक मीटरपेक्षाही कमी पाणी आहे. दुसऱ्या आवर्तनात पाण्याची आवकही कमी आहे. जरळी बंधाऱ्यातून साधारण 100 क्‍युसेक्‍सने पाणी पुढे जात होते. गडहिंग्लज पाटबंधारे शाखेने यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. आजरा तालुक्‍यातील भादवणपासून पश्‍चिमेकडील सर्व बंधाऱ्यांत गरज नसताना तीन मीटरने पाणी अडवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच पूर्व भागातील गडहिंग्लज तालुक्‍याच्या हद्दीतील पात्राने तळ गाठल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, रविवारी (ता. 4) सकाळपासून या बंधाऱ्यातील जादाचे बरगे काढण्याचे काम सुरू होते. दीड मीटरने बरगे ठेवून उर्वरित पाणी खाली सोडावे लागत असूनही बंधाऱ्यामध्ये तीन मीटरचा साठा कशासाठी केला, तो कोणी केला, लोकांनी बरगे घातल्याचे म्हणणे असेल तर कारवाई का होत नाही, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले का, हे सारे प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. या प्रकारावरून आजरा व गडहिंग्लज पाटबंधारेच्या नियोजनात समन्वय नसल्याचेच स्पष्ट होते. येथे नव्याने रुजू झालेल्या उपअभियंत्यांचेही या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता नियोजनाच्या या गोंधळात आमदार राजेश पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. 

चुकांवर पांघरूण 
आजऱ्यात तीन मीटरने पाणी अडवल्याने गडहिंग्लज हद्दीतील पात्राने तळ गाठला आहे. या कारणाकडे डोळेझाक करून अधिक उपशामुळे नियोजित ठिकाणी पाणी पोहचण्यास उशीर होत असल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने 3 एप्रिलपासून अचानक उपसाबंदी लागू केली आहे. या निर्णयाद्वारे स्वत:च्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पाटबंधारेने केला आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उसासाठी लागवड टाकून पाणी देण्याचे नियोजन केले आहे. असे असताना अचानक उपसाबंदीने शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे भडगावचे शेतकरी अनिकेत कोणकेरी यांनी सांगितले. तीन वर्षांपासून उपसाबंदीची न लागलेली गरज यंदाच का भासते, अशी विचारणाही त्यांनी केली. 

दोन दिवसात पाणी पोचेल
आजरा हद्दीतील बंधाऱ्यांमध्ये तीन मीटरने बरगे होते. काही लोकांकडून हा प्रकार घडल्याचे कळते. परिणामी गडहिंग्लज तालुक्‍यात पाण्याची आवक कमी होत होती. आज बरगे काढल्याने पाणी गतीने पुढे जाईल. दोन दिवसांत खोत बंधाऱ्याला पाणी पोहोचेल. त्यामुळे उपसाबंदीचा कालावधी कमी होईल. 
- तुषार पोवार, शाखा अभियंता पाटबंधारे

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com