भेंडीनेही खाल्ला भाव : दराने घेतली दीडशेची धाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

कुरुंदवाड भाजीपाला मार्केटमधील लिलावात दर

कुरुंदवाड (कोल्हापूर)  : येथील हजरत दौलत शहावली भाजीपाला मार्केटमध्ये आज झालेल्या लिलावात भेंडीला तब्बल १५६ रुपये किलो इतका उच्चांकी भाव मिळाला. येथील भाजीपाला लिलावात भेंडीला इतिहासात सर्वाधिक दर आज मिळाल्याचे दलालांनी सांगितले. पंधरवड्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने सगळ्याच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र आज भेंडीच्या दराने कमालच केली.

हेही वाचा - विधानसभेची वर्षपूर्ती ः आठ आमदारांना घरी बसवलेला निकाल -

येथील भाजीपाला मार्केटात बाळू बागवान (दलाल) यांच्याकडे येथील बाबासाहेब मालगावे या शेतकऱ्याच्या भेंडीचा लिलाव सुरू झाल्यानंतर सांगली येथील सतीश देवकर या व्यापाऱ्याने सत्तर रुपयांपासून बोलीला सुरुवात केली. बोली वाढतच गेली आणि १५६ रुपयांवर येऊन पोहोचली. प्रतिकिलो १५६ रुपये याप्रमाणे ८५ किलो भेंडीचा उठाव व्यापाऱ्याने केला. व्यापाऱ्याच्या या बोलीने अन्य दलालांकडील भेंडीनेही भाव खाल्ला. परतीच्या पावसाने भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भेंडीची आवक कमी असल्याने शिवाय येणारा माल दर्जेदार असल्याने त्याचा लिलाव १५६ रुपयांपर्यंत गेला. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lady finger high of Rs 156 per kg Auction rates at Kurundwad Vegetable Market kolhapur