लमाण समाजाचा समावेश अनुसूचित जाती-जमातीत करावा - व्यंकाप्पा भोसले

Laman community should be included in Scheduled Castes and Scheduled Tribes
Laman community should be included in Scheduled Castes and Scheduled Tribes

कोल्हापूर : ""लमाण समाजाचा अनुसूचित जाती-जमातीमध्ये समावेश झाला पाहिजे. जेणेकरून समाजाला शासनाच्या सर्व सवलतींचा लाभ मिळेल. हा समाज मुख्य प्रवाहात येईल. याबरोबरच लमाण समाजाने मुलांना शिक्षणाकडे घेऊन जावे'', असे प्रतिपादन व्यंकाप्पा भोसले यांनी केले. 
लमाण समाज विकास संघातर्फे आज संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती झाली तसेच मेळावा झाला. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा झाली. तत्पूर्वी "हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा लमाणी महिलांबद्दल असभ्य, अश्‍लिल लिखाण केले आहे. या लिखाणामुळे देशातील 11 कोटी बंजारा समाज बांधवांमध्ये असंतोष आहे. यासाठी लेखक श्री. नेमाडे यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नेमाडे यांच्याविरुद्ध निवेदनही देण्यात येणार आहे. 
श्री. भोसले म्हणाले, ""लमाण समाजाने समता, विषमता समजून घेतली पाहिजे. विषमतेवर आधारलेली समाजरचना बदलण्यासाठी समाजाने पुढे यावे. परिवर्तनाच्या लढ्यात सामील झाले पाहिजे. समाजाचे लोक प्रशासनात उच्चपदावर कार्यरत आहेत; पण शिक्षण, नोकरी, प्रशासनानील प्रमाण कमी आहे. आजही या समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी खूप त्रास होतो. आरक्षणाचा लाभ या समाजालाही मिळाला पाहिजे. त्यांनी मुला-मुलींना शिक्षण द्यावे. शासनाच्या माध्यमातून आश्रमशाळा उभ्या केल्या आहेत. या आश्रमशाळेचा फायदा घ्यावा.'' 
लमाण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र पवार म्हणाले, ""संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादी शिकवण देणारे होते. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भूतदया, निसर्गप्रेम, सत्य, अहिंसा आदींवर वचने, दोहे, कवणे, भजने या रुपात त्यांनी प्रकट केली. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित यावे.'' 
भटके विमुक्त विकास परिषदेचे अशोक लाखे, प्रकाश सातपुते, शिवाजी पवार, रवींद्र राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष राठोड यांनी सूत्रसंचालन केले. विमल राठोड, संगीता राठोड, प्रकाश चव्हाण, राजू राठोड, किसन राठोड, पांडुरंग पवार, अविनाश शेलार, रामदास राठोड, पुंडलिक चव्हाण, रोहिदास राठोड यांनी नियोजन केले. 

संपादन - यशवंत केसरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com