एलसीबीची कारवाई ; भांगेच्या गोळ्यासह तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

तो 10 ग्रॅमच्या पुड्या करत होता 

 

कोल्हापूर : बोरवडे तिट्टा, मुरगूड येथील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून दीड किलो गांजा, भांगेच्या गोळ्या, गुटखा असा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजित बळीराम पाटील (रा. बोरवडे तिट्टा, मुरगूड) आणि अनिल तावडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती,

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना बोरवडे तिट्टा, मुरगूड (ता. कागल) येथील एका घरात गांजासह अमंली पदार्थाचा साठा केल्याची माहिती मिळाली. याबाबत कारवाईच्या सूचना त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिल्या. त्यानुसार पथकाने येथील संशयित अभिजित पाटीलच्या घरावर छापा टाकला. यात दीड किलो वजनाचा गांजा, भांगेच्या 19 गोळ्यांचे पाकीट, पाच प्लॅस्टिक पोत्यामधील गुटखाजन्य पदार्थास हे पदार्थ विक्रीतून प्राप्त केलेली 2 लाख 46 हजार 80 रूपयांची रोकडसह एकूण 3 लाख 8 हजार 976 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. संशयित अभिजित व अनिल या दोघांवर मुरगूड पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक डॉ. धिरजकुमार बच्च, बनोथ मुघेंद्रलाल, सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले कर्मचारी अजित वाडेकर, महेश गवळी, अनमोल पोवार, ओंकार परब, रणजित पाटील, सुकुमार हासुरकर आदींनी केली. 

हेही वाचा- हृदयद्रावक :  लेकीच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही सोडले प्राण

10 ग्रॅमच्या गांजाच्या पुड्यांची विक्री... 
संशयित अभिजित पाटील हा गांजा, अमंली पदार्थ होलसेल दरात संशयित अनिल तावडेकडून खरेदी करत होता. तो मुरगूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाच्या 10 ग्रॅमच्या पुड्या तयार करून त्याची विक्री करत होता. अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LCB action More than three lakh items seized Gutkha with 1.5 kg