esakal | कोल्हापुरच्या बिंदू चौकात नव्या कृषी विधेयकाची होळी ; 28 सप्टेंबर पासून व्यापक जनजागृती मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

Left organizations  activists of coordination committees Bindu Chowk Kolhapur protest of against in agriculture bil

डावे पक्ष भाजप सरकारला सळो की पळो करुन सोडणार

कोल्हापुरच्या बिंदू चौकात नव्या कृषी विधेयकाची होळी ; 28 सप्टेंबर पासून व्यापक जनजागृती मोहिम

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकी विधेयकांचा विरोध देशातील सर्व किसान संघटना सध्या करत आहेत. कोल्हापूरातील बिंदू चौकामध्ये सर्व डाव्या संघटना, समन्वय समित्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र नव्या कायद्यांची होळी केली. कोल्हापूर शहरातील आंदोलना बरोबरच वडगाव,शिरोळ गारगोटी, शाहुवाडी, पन्हाळा यासह इतरही तालुक्यात आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलनास संबोधित करताना निमंत्रक व किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे म्हणाले, 'या विधेयकामुळे बाजार समित्यांचे अधिकार कमी करून कार्पोरेट व्यापाऱ्यांना सर्व सवलती जाहीर झाल्या आहेत. ट्रेडर्सना स्टॉकचा अधिकार मिळाला असून शेतकऱ्यांचा माल स्वस्तात घेण्यासाठी खुली सूट मिळाली आहे. कंत्राटी शेतीमुळे छोटा सीमांत शेतकरी शेतीतून उद्ध्वस्त होणार आहे. शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढवत देशभर 28 सप्टेंबर या भगतसिंग जयंतीदिनी भाजप सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमेस सुरुवात होणार आहे.'

शेकापचे बाबासाहेब देवकर म्हणाले,'या तिन्ही विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील.

हेही वाचाकोरोनामध्ये जगणं शिकताना... -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जनार्दन पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील, हे भाजपचे अध्यक्ष श्री. नड्डा यांचे आश्वासन धादांत खोटे आहे. कारण केवळ ६ टक्के शेतकरीच या हमीभावाचा लाभ घेतात, त्यामुळे हमीभाव देण्याची काही गरज नाही, एफसीआय आणि नाफेड खरेदी देखील थांबवावी, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणारा अन्नधान्याचा पुरवठाही थांबवावा, असे खुद्द भाजप सरकारने नियुक्त केलेल्या शांता कुमार समितीनेच जाहीर केले आहे.

आंदोलनात उदय नारकर,संदीप देसाई, रवी जाधव, अतुल दिघे,  गिरीष फोंडे यांची भाषणे झाली. शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेती विधेयके हाणून पाडा, शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा- माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून नव्या कृषी विधेयकाची होळी ; विधेयकाविरोधाक देशभरात संताप

यावेळी चंद्रकांत यादव, दिनकर सूर्यवंशी, नामदेव पाटील, केरबा पाटील, एम के नाळे ,बाबुराव कदम, शंकर काटाळे, वाय एन पाटील, सरदार पाटील, रघुनाथ कांबळे, सुभाष जाधव, दिलदार मुजावर, उत्तम पाटील, सरदार पाटील, बाळासो कुंभार, दिपाली कोळी, शुभांगी पाटील दत्ता मेटील, रामचंद्र मेटिल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.तसेच या आंदोलनात किसान समन्वय समितीचे सदस्य,  महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष,  स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, लाल निशाण पक्ष या संघटना व पक्ष सहभागी झाले.

संपादन - अर्चना बनगे