जाऊ दे यांना, हुश्‍श अन्‌ गाडी स्टार्ट.. 

Let it go, start the car.
Let it go, start the car.
Updated on

कोल्हापूर : नाक्‍यावर गाड्यांची लांब रांग लागलेली, पहिल्या गाडीतल्यांना खाली उतरवले जाते, नाक्‍यावरच एका पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या पोलिस अधिकाऱ्यांपुढे उभे केले जाते. पोलिस अधिकारी कागदपत्रे मागतो, एकेक कागद तपासत जातो. तसतसा समोर उभे असलेल्यांच्या चेहऱ्यावरचा ताण वाढत जातो.

यात दोन-चार मिनिटांचा वेळ जातो आणि काही शंका नसेल, तर "जाऊ द्या यांना' असा आदेश देतो. जाऊ दे यांना, हे शब्द कानावर पडले की, समोरचे लोक शब्दश: हुश्‍श अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि चाळीस, पंचेचाळीस दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता कधी एकदा घराकडे पोहोचतो, अशा समाधानाच्या भावनेत गाडीला स्टार्टर मारतात. 
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच्या कणेगाव नाक्‍यावरचे हे चित्र आहे. हा नाका केवळ कोल्हापुरात किंवा सांगली जिल्ह्यात येण्यासाठीचा नाका नाही. कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, आंध्र किंवा अगदी दक्षिणेस अगदी कन्याकुमारीपर्यंत जायचं असले तरी कणेगाव नाका हा महत्त्वाचा टप्पा आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हा नाका म्हणजे प्रवाशाच्या परवानगी प्रक्रियेचा एक हॉटस्पॉट झाला आहे. 
काल रात्री साडेदहाची वेळ. काही तासापूर्वी वळवाचा पाऊस पडून गेला. त्यामुळे हवेत गारवा. नाक्‍यावर अमोरासमोर चार ते पाच तात्पुरते शेड. प्रत्येक शेडमध्ये पोलिस. रात्री दहाची वेळ असूनही नाक्‍याच्या पलीकडे व अलीकडे वाहनांची रांग लागलेली. अगदी सहाआसनी रिक्षांपासून ते किमती गाड्या रांगेत ओळीने उभ्या. त्यातल्या सर्वांनाच आपापल्या गावी, घरी जाण्याची ओढ लागलेली. या नाक्‍यावरची प्रक्रिया म्हणजे, अंतिम टप्प्यातील प्रक्रिया. येथून एकदा कोल्हापूर जिल्ह्यात किंवा सांगली जिल्ह्यात जायला परवानगी मिळाली की, घराकडे जायची वाट सोयीची. सर्वांनाच चाळीस-पन्नास दिवसाच्या प्रतीक्षेनंतर घराकडे जायला मिळत असल्याने सगळेच टेन्शनमध्येच या नाक्‍यावर उभे होते. कोठेही गडबड नाही, गोंधळ नाही. पोलिसांनी शिटी मारली की, सारे चिडीचूप. कारण या नाक्‍यावरून पुढे जाण्यास नाकारले की, घराकडे जायची संधी हुकली हे ठरलेले. त्यामुळे या नाक्‍यावर थांबलेल्या प्रत्येकाच्या नजरेत घरी जाण्याची एक आशा क्षणाक्षणाला जाणवत होती. 
या नाक्‍यावर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात कोणी जाणार असले तरी त्याची नोंद घेतली जाते. त्याच्या हाती मेडिकल स्लिप दिली जाते. सर्वांनी या स्लिपमध्ये नमूद केलेल्या सात-आठ पैकी कोणत्याही केंद्रातून मेडिकल चेकअप करून घेऊनच घरी जाण्याची सूचना दिली जाते. आणि जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाणार असेल, तर त्या राज्याची परवानगी त्यांच्याकडे असेल, तरच पुढे जाऊ दिले जाते. नाहीतर आधी थेट "यू टर्न' घेऊन जेथून आला, तिकडे नाक्‍यावरून परत जाण्यास सांगितले जाते. 
या निमित्ताने नाक्‍यावर आशा-निराशा, उत्सुकता याचा 24 तास एक खेळ रंगलेला असतो. लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत, अन्य राज्यांत अडकून राहिलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर या नाक्‍यावरून एकदा आपण आत गेलो की, काही वेळात आपापल्या गावात, घरात पोहोचणार या समाधानाचा भाव असतो. गावाची, घराची प्रत्येकाच्या मनात ओढ काय असते, याचा पदोपदी अनुभव या नाक्‍यावर येतो. 

सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी सात या तीन पाळ्यांत 24 तास काम येथे चालते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे 100 पोलिस नाक्‍यावर असतात. येथेच त्यांना जेवणाचे पाकीट येते. एक क्षण पोलिसांना थांबायला वेळ नसतो; पण त्यातही ते कसेबसे जेवण उरकतात. या नाक्‍यावर अनेकजण अपुऱ्या माहितीने आलेले असतात. काहीजण या सायबाचे नाव, त्या सायबाचे नाव सांगून सोडण्याचा नको इतका आग्रह करतात. हीच ठराविक मंडळी पोलिसांची बीपी वाढवतात. कितीही शांत राहायचे पोलिसांनी ठरवले तरी अशा मंडळींमुळे पोलिस उचकतात. तडातडा बोलतात. याचा सर्वांनाच त्रास होईल म्हणून रांगेतील इतर लोक कावरेबावरे होतात; पण चिडलेले पोलिस तिततक्‍याच तातडीने शांतही होतात. 

नाक्‍यावर थांबणाऱ्या प्रत्येक गाडीतील लोकांना घरी पोहोचायची ओढ आहे. त्यांची ही भावना ओळखून आम्ही जितक्‍या लवकर त्यांना आत प्रवेश देता येईल, तितक्‍या लवकर झटपट प्रवेश देतो. आणि प्रवेश दिल्याचा लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही आमचा त्रास विसरून जातो. 
- शशिकांत सावंत, पोलिस निरीक्षक  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com