प्रसंगी कर्ज काढून बळीराजाला मदत करू ; ग्रामविकास मंत्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

. कोरोनाच्या संकटात राज्याचे उत्पन्न घटले आहे. पण, प्रसंगी कर्ज काढून बळीराजाला मदत करु, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

गडहिंग्लज : परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. याची जाणीव महाविकास आघाडीला आहे. कोरोनाच्या संकटात राज्याचे उत्पन्न घटले आहे. पण, प्रसंगी कर्ज काढून बळीराजाला मदत करु, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाबाबत आढावा बैठक झाली. त्यानंतर श्री. मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची उपस्थिती होती. 

श्री. मुश्रीफ म्हणाले,""कोरोनाची रुग्णसंख्या आठ दिवसात कमी झाली आहे. पण, अद्याप धोका टळलेला नाही. नवरात्रौत्सव समोर आहे. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली तशाच पद्धतीने नवरात्रौत्सवानंतरही रुग्ण वाढतील असा तज्ज्ञांनी अदांज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या 70 टक्के लोक मास्क वापरत आहेत. त्यामुळे संक्रमण कमी झाले आहे. डिसेंबरनंतर जनजीवन पूर्वपदावर येईल अशी आशा आहे.'' 

प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, चंदगडचे तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शरद मगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा कुण्डलिनीस्वरूपा श्री अंबाबाई...!  करवीर महात्म्यातील निवडक स्त्रोतांमधून देवीचे होणारे दर्शन

 

कोरोनानंतरचे उपचार... 
कोरोना रुग्णांवर केलेल्या औषधोपचाराचे काही साईड इफेक्‍टही आहेत. त्या औषधांचा परिणाम दिर्घकाळ राहतो. त्यामुळे कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरचे उपचारही महत्वाचे आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये असे उपचार सुरु करावेत, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले. 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets get out of debt and help farmer Minister for Rural Development