उद्योगांचा वीज बिल दरवाढीचा प्रश्‍न निकाल काढू ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्योजकांना ग्वाही

संदीप खांडेकर
Monday, 10 August 2020

द्योगाच्या वीज बिल दरवाढीचा प्रश्‍न निकालात काढू, असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींना आज दिले.

कोल्हापूर : उद्योगाचा वीज बिल दरवाढीचा प्रश्‍न निकालात काढू, असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींना आज दिले. कराड येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योजकांनी श्री. पवार यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन दिले. 
औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांना स्थगिती दिलेल्या महिन्यातील स्थिर आकार या महिन्यातील बिलात समाविष्ट झाल्याने उद्योजकांत तीव्र नाराजी आहे. संचारबंदीच्या महिन्यांतील स्थिर आकार रद्द करु, असे आश्वासन सरकारने दिले होते. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांच्या उपस्थितीत शनिवारी उद्योजकांची बैठक झाली होती. त्यात या प्रश्‍नाबाबत शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वीज बिल दराबाबत निवेदन देण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार आमदार जाधव यांच्यासमवेत उद्योजकांनी श्री. पवार यांची भेट घेतली. उद्योजकांनी उद्योग क्षेत्राच्या अडचणी मांडल्या. तसेच शासनाने जर मदतीचा हात दिला नाही. तर उद्योग टिकणार नाही, ते बंद पडतील, अशी शक्‍यता व्यक्त केली. शिष्टमंडळात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांचा समावेश होता. 

मंत्र्यांसोबत चर्चा करणार 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगांच्या वीज बिलाच्या स्थीर आकाराचा मुद्दा जाणून घेतला व सकारात्मक चर्चा केली. आमदार जाधव यांना मंगळवारी (ता. 11) चर्चेसाठी आमंत्रित केले असून, त्यावेळी संबंधीत खात्यांचे मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून वीज बिलाचा मुद्दा निकाली काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's resolve the issue of increase in electricity bill of the industry: Senior leader Sharad Pawar testified to the entrepreneurs