लॉकडाउनची वर्षपूर्ती : ‘तो’ काळ अंगावर शहारे आणणारा!

lockdown one year completed memory on kolhapur covid 19 marathi news
lockdown one year completed memory on kolhapur covid 19 marathi news

कोल्हापूर : ‘न भूतो न भविष्यति’ अशा कोरोनाच्या संकटाने जिल्ह्याला हादरवून सोडले. वर्षापूर्वी आलेल्या या संकटातून जिल्हा हळूहळू सावरतो आहे. वर्षभरात जिल्ह्यात कोरोनामुळे १७५६ लोकांचा मृत्यू झाला, तर ५१ हजार २०७ लोकांना आजअखेर कोरोनाची बाधा झाली. नोकरी, शिक्षण, उद्योग व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेर असलेल्या ३ लाख जणांना घरी परतावे लागले. तर एवढ्याच परप्रांतीयांनी कोल्हापूर सोडून मूळ गावची वाट धरली. उद्योग-व्यवसायाची चाके थांबली. हजारो बेरोजगार झाले. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद झाली.

परीक्षा थांबल्या. मुलांचे मोठे नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षणाने काही प्रमाणात मुलांना सावरण्याचा प्रयत्न झाला. विकासकामांना खीळ बसली. गावगाडा ठप्प झाला. लॉकडाउनच्या घोषणेने शहरं, गावे थबकली. अवघं जगणं चार भिंतीत बंदिस्त झालं. कोरोनावर मात करण्यासाठी शासन, प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले, अद्यापही ते सुरूच आहेत. आज लॉकडाउनची वर्षपूर्ती होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न केल्यास पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. पुन्हा लॉकडाउन परवडणारे नाही. कोरोना अद्याप आहे, त्यामुळे खबरदारी घ्या...नियमांचे पालन करा...त्यातच जगणं सुरक्षित आहे.- 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २३ मार्चला सापडला. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ भागात सापडलेल्या या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर यशस्वी उपचारानंतर त्याचा प्लाझ्मा घेऊन इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर रोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत गेले. कोरोनावर उपचार करण्यासाठी प्रयोगशाळा चाचण्यांसाठी मशिनरी खरेदी करण्यात आली. यावर कोरोनाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ८२ हजार ५२५ स्वॅब नमुने तपासणी केलेले आहेत. सीबीनॅट (१८८३), रॅपिड अँटीजेन (४६५०६), आरटीपीसीआर (२५९५११), ट्य्रूनेट (२२४३) अशा चाचण्या केल्या. कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.४२ आहे तर मृत्यूचे प्रमाण ३.४४ टक्के आहे.


कोविड सेंटरची सुविधा
‘बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये ५ कोविड रुग्णालये तसेच १३ समर्पित कोविड आरोग्य केंद्रे व कोविड काळजी केंद्रे ४९ करण्यात आली होती. सध्या ३  जिल्हा कोविड रुग्णालये, ३ कोविड केअर सेंटर सुरू आहेत. जिल्ह्यात ३ लाख १५ हजार लोकांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यात आले असून तातडीने उपचार व माहिती घेतलेली आहे. आजपर्यंत १५ हजार ५०० रुग्णांना ५ कोटी ५ लाख रुपयांच्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन्सचा मोफत पुरवठा केलेला आहे.


खर्च आणि चौकशी
‘कोरोना’विषयक खरेदी करताना खरेदी नियम व आदेशांची पायमल्ली करण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या पुरवठादारांनी वाजवी किमतीपेक्षा जादा दराने खरेदी केली आहे, त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गरजेपेक्षा जादाचा साहित्य पुरवठा केल्याप्रकरणीही दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


लेखापरीक्षणाने उडवली झोप
जिल्ह्यातील कोविड खरेदीची तपासणी लेखापरीक्षकांनी केली आहे. एकूण २६० मुद्द्यांचा अहवाल सादर केला आहे. खरेदीत पारदर्शकता नसणे, मनमानी खरेदी करणे, अनावश्‍यक खरेदी व त्यातील अनागोंदी कारभारावर लेखापरीक्षणात बोट ठेवले आहे. सुमारे १२ कोटी रुपये तर वसूलच करावेत, असा अभिप्राय दिला आहे. लेखापरीक्षण व खरेदीतील घोटाळ्याचा हा विषय जिल्हा परिषदेपासून विधान भवनापर्यंत गाजला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व विशेषत: खरेदीत सहभागी असणाऱ्या यंत्रणेचे धाबे दणाणले. 


केंद्रीय पथकाने दिली भेट
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय असणाऱ्या जिल्ह्यांना केंद्रीय आरोग्य पथकाने भेट दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. एकूण ७ जिल्ह्यांना भेट देण्यात आली. यावेळी कोरोना रुग्णांची वाढती संख्या व उपाययोजना यांची माहिती या पथकाने घेतली. 


नेतेमंडळींनाही बाधा
 ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक आदींनाही कोरोनाचा सामना करावा लागला.


कोविड लसीकरण सुरू
जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत १ लाख ७० हजार ६८६ लोकांना पहिला डोस दिला आहे. तर १७ हजार ३०३ लोकांना दुसरा डोस दिला आहे. एकूण १ लाख ८७ हजार ९८९ लोकांना लसीकरण केले असून एकूण उद्दिष्टाच्या ८५ टक्‍के लसीकरण पूर्ण केले आहे.
बाधितांच्या संपर्कातील शोधणे आव्हानकोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेणे आवश्‍यक आहे; मात्र सद्यस्थितीत ही यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील केवळ १० ते १२ लोकांचा शोध घेण्यात येतो. वास्तविक ही संख्या किमान २० ते ३० असणे आवश्‍यक आहे. बाधितांचा संपर्क होत नसल्याने मृत्युदरात वाढ होत आहे.रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे वाटप


जिल्ह्यासाठी १५ हजार ५०० रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेण्यात आली आहेत. त्यातील ७ हजार इंजेक्‍शनचे वितरण खासगी ठिकाणी केले, तर ८ हजार ५०० इंजेक्‍शनचे वाटप करण्यात आले आहे. १० हजार होम आयसोलेशन किट वाटप करण्यात आली. ज्यांची किंमत प्रत्येकी १२०० रुपये आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. टोलनाक्‍यावर आरोग्य पथके तैनात करण्यात आली. ग्राम समित्यांचा सक्रिय सहभाग राहिला. मास्क नाही तर प्रवेश नाही, ही लोकचळवळ निर्माण झाली. ६१,९२७ इतक्‍या संस्थात्मक अलगीकरणमधील लोकांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

‘तो’ काळ अंगावर शहारे आणणारा!
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून माझ्या नावाची नोंद झाली. गेल्यावर्षी याच काळात भीतिदायक वातावरण होते. कोरोनावर कोणताही उपचार नव्हता. देश-विदेशातून सामोरे येणाऱ्या कोरोनाच्या परिणामांमुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे लक्षात येताच कोणत्या दवाखान्यात दाखल व्हायचे, तेथे कोणते उपचार होणार, याची काहीही माहिती नव्हती. त्यातच माझ्या बहिणीलाही कोरोना झाल्याचे समजल्यानंतर उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली होती.

आजही तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात. सध्या कोरोनावर लस उपलब्ध झाली असली तरी लोकांनी काळजी घ्यायलाच हवी. सध्या मी पुण्यातच राहत आहे. पुण्यासह राज्यातील इतर भागांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत; पण गेले वर्षभर मी मास्कचा नियमित वापर करत आहे, सॅनिटायझर वापरत आहे. आपल्यामुळे आपले कुटुंब अडचणीत येऊ नये, याची काळजी घेत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काळजीपूर्वक राहात आहे. सर्वांनी मास्क आवर्जून वापरावा. हलगर्जीपणा करू नये, शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, कारण संकट अजून टळलेले नाही.

- कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com