घरबसल्या फुटबॉलच्या नियमांची उजळणी

दीपक कुपन्नावर
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कोरोनामुळे कोल्हापुरी फुटबॉलचा हंगाम बहरात येण्यापूर्वीच ठप्प झाला. खेळाडूंचे मैदानाशी नाते दुरावले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत खेळाडू आणि प्रशिक्षकांचे प्रबोधन व्हावे यासाठी येथील महाराष्ट्र हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमांची उजळणीचा उपक्रम राबविला आहे. 

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापुरी फुटबॉलचा हंगाम बहरात येण्यापूर्वीच ठप्प झाला. खेळाडूंचे मैदानाशी नाते दुरावले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत खेळाडू आणि प्रशिक्षकांचे प्रबोधन व्हावे यासाठी येथील महाराष्ट्र हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमांची उजळणीचा उपक्रम राबविला आहे. 

कोल्हापूरच्या फुटबॉल केंद्रात 200हून अधिक संघ आणि सुमारे अडीच हजार फुटबॉल खेळाडू आहेत. यंदाचा हंगामही मोठ्या चुरशीने सुरू होता. प्रॅक्‍टीस फुटबॉल क्‍लबने केएसए लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपली हुकूमत कायम ठेवली होती. बाद पद्धतीच्या स्पर्धांनाही मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे अनेक संयोजकांनी स्पर्धांसाठी तारखा निश्‍चित केल्या होत्या. संपूर्ण हंगामाच्या तारखा हाऊसफुल्ल झाल्या होत्या. परंतु, ऐनवेळी कोरोनामुळे हंगामाला ब्रेक लागला. 

प्रदीप साळोखे हे फुटबॉल क्षेत्रातील जाणकार पंच आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरचा शालेय फुटबॉलमधील ब्राझील म्हणून नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूलचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी फुटबॉल खेळाची माहिती व नियम हे पुस्तक मराठीत प्रकाशित केले आहे. साळोखे हे रोज माध्यमाच्याद्वारे रोज पाच नियमांची माहिती छायाचित्रासह सर्वापर्यंत पोहोचवत आहेत. ही माहिती मराठीत असल्याने खेळाडू प्रशिक्षकांना उपयुक्त ठरत आहे.

कोल्हापूर फुटबॉल क्षेत्राच्या संबंधित शेकडो व्हॉट्‌स ऍप ग्रुप आहेत. या सर्व ग्रुपच्या माध्यमातून ही नियमांची उजळणी सुरू आहे. त्यामुळे फुटबॉल स्पर्धा थांबल्या असल्या तरी नियमांच्या उजळणीच्या माध्यमातून खेळाडू आणि प्रशिक्षक अपडेट होत आहेत. 

नियम माहिती व्हावेत यासाठी धडपड
जगात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉलच्या नियमांची सर्व पुस्तके इंग्रजीत आहे. फुटबॉल स्पर्धावेळी अनेकदा मैदानावर प्रतिस्पर्धी संघ, पंच, आणि खेळाडूत नेहमीच वादाचे प्रसंग उद्‌भवतात. त्याला नियमाबद्दलचे अज्ञान हेच कारणीभूत असते. लॉकडाऊनच्या माध्यमातून फुटबॉलचे नियम माहिती व्हावेत यासाठी माझी धडपड आहे. 
- प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Lockdown Time Review The Rules Of Football Kolhapur Marathi News