परतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी ; काढणीला आलेला भात पाण्यात

राजू पाटील
Wednesday, 14 October 2020

भाताची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. दाणे भरुन आधीच वाकलेले भात पावसाच्या माऱ्याने भुईसपाट झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे सुगीवर पाणी फिरले आहे. कापणी योग्य झालेले भात पावसामुळे अक्षरशः झोपले असून त्यावर आता पाणी तरळू लागले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. राधानगरी तालुक्यातील दहा हजार हेक्टरवरील भाताच्या सुगीवर ढगांचे सावट आहे.

गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात सुगीला गती आली आहे. भात कापणीसाठी शिवारं गजबजू लागली आहेत. मात्र रोज सायंकाळी येणारा पाऊस व्यत्यय ठरत आहे. कालपासून तर अक्षरशः भात पिकांची नासधूस सुरू झाली आहे. काल मंगळवारी सायंकाळी धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे भात कापणी आणि मळणी अर्ध्यावर टाकून शेतकऱ्यांना घरी यावे लागले. आज पहाटेपासून पावसाने एकसारखी रिपरिप सुरू केली आहे. त्यामुळे भात कापणीचे सर्व मनसुबे या पावसामुळे उधळले आहेत. नदीकाठच्या शिवारातील धुळवाफ केलेले भात सध्या कापणीच्या टप्प्यात आहे. पिवळीजर्द झालेली शिवारे टप्प्याटप्प्याने कापली जात आहेत. याला चांगलीच गती आली आहे. मात्र आजच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

पहाटेपासून एकसारखा पाऊस कोसळतोय. त्यामुळे भाताची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. दाणे भरुन आधीच वाकलेले भात पावसाच्या माऱ्याने भुईसपाट झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. असाच पाऊस झाल्यास लोंब्या पाण्यात राहतील आणि कोंब येण्याची भीती बळीराजाला आहे. तर भात कापून मळून शिवारात पसरलेले पिंजर कुजण्याची शक्यता आहे.

हे पण वाचादख्खनचा राजा श्री जोतिबाचे मानाचे उंट, घोडे या गावात ठेवले जातात चार महिने संरक्षणासाठी 

तालुक्यात साधारणतः दहा हजार एकरवर भात असते. यामध्ये सहा हजार हेक्टरवर पेरणी तर चार हजार एकरवर रोप लागण आहे. हे सर्व भात कापणीच्या टप्प्यात आहे. याशिवाय डोंगरमाथ्यावरील भुईमूग, कारळा, नाचणी ही पिके ही आता अंतिम टप्प्यात आल्याने या पावसामुळे मोड येण्याची भीतीही निर्माण झाली आहे. डोंगरातील गवत पडून कुजण्याची भिती आता शेतकऱ्याला सतावू लागली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of paddy crop due to return rains