55 वर्षांची परंपरा असणारा माडग्याळी मेंढी बाजार संशोधन संवर्धन प्रस्ताव दप्तर दिरंगाईतच

राजू पुजारी
Monday, 7 December 2020

प्रस्ताव दोन वर्षे पडून; ग्रामपंचायतीने जागाही दिली, तरी दुर्लक्ष 

संख (सांगली)  : माडग्याळ (ता. जत) येथील मेंढी संशोधन, पैदास, जतन व संवर्धन केंद्र दोन वर्षांपासून दप्तर दिरंगाई व शासनाच्या लालफितीत अडकले आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत घोषणा केली होती. ती हवेतच विरली आहे.   , पैदास जतन व संवर्धन केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 

तालुक्‍यात शेळ्याची संख्या 1 लाख 1 हजार 430, मेंढ्यांची संख्या 56 हजार 259 इतकी आहे. खिलारी जनावरांसाठी, माडग्याळ मेंढ्यासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. विक्रीसाठी पशुखाद्य, खुराक घालून शेळ्या-मेंढ्यांची जोपासना करतात. 
मेषपालन व्यवसाय प्रामुख्याने मांस उत्पादनाकरता केला जातो. कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे येथील मेंढी काटक असते. माडग्याळ, परिसरातील मेंढपाळांनी "माडग्याळ मेंढी' ही जात विकसित केली आहे. पांढरा रंग व त्यावर तपकिरी रंगाचा भाग, फुगीर नाक, लांब पाय, निमुळती व लांब मान, शिंगे नसलेली ही मेंढी, काटक व अवर्षण स्थितीत टिकाव धरून राहण्याची क्षमता असलेली आहे. 

या जातीचे जतन, पैदास आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे होणे आवश्‍यक आहे. म्हणून मूळस्थानी माडग्याळ येथे मेंढीचे संशोधन होऊन उत्तम प्रकारची प्रजाती निर्माण व्हावी, उत्पन्न वाढावे याचा पशुपालकांना फायदा व्हावा, लोकांचे जीवनमान उंचवावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय शेळी-मेंढी संशोधन केंद्र व्हावे ही फार वर्षांपूर्वीची मागणी आहे. 

तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व मुख्य सचिव माडग्याळ येथे 2018 मध्ये दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मेंढीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती. पशुसंवर्धन विभागाने ग्रामपंचायतीकडे प्रस्तावाची मागणी केली. ग्रामपंचायतीने खंडोबा मंदिराजवळील जागा देण्यास संमती दिली. प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. हा प्रस्ताव 2 वर्षांपासून शासन दरबारी रखडला आहे.पशुसंवर्धन विभागाने पाठपुरावा करून माडग्याळी मेंढी संशोधन, जतन, पैदास केंद्र सुरू करावे, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे. 

हेही वाचा- समुद्राच्या निळ्या लाटांमधून निसर्गाने दिला धोक्याचा इशारा -

55 वर्षांचा बाजार 
माडग्याळचा शेळी-मेंढीचा शुक्रवारचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे. 55 वर्षांची परंपरा आहे. माडग्याळी मेंढी, शेळी, बोकड खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकातील व्यापारी बाजारात येतात. कोट्यवधींची उलाढाल होते. 

रांजणी येथे संवर्धन केंद्र 
केंद्राच्या कृषी मंत्रालय व पशुसंवर्धन विभागाचा रांजणी येथे माडग्याळ मेंढी संवर्धन व विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. माडग्याळी मेंढी व नर विकत घेऊन प्रक्षेत्रावर जतन, पैदास, संवर्धन केले जात आहे. 

माडग्याळी मेंढी संशोधन, संवर्धन केंद्र सुरू करून पशुपालन व्यवसायाला चालना द्यावी. शेतीला जोड व्यवसाय विकसित होईल. 
- जत पूर्व भागातील एक पशुपालक  
 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madgyal sheep research, conservation proposal backpack delayed