'मैफल रंग-सुरांची' यंदा ऑनलाईन ! फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेता येणार आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

उद्या आयोजन ः डॉ. नलिनी भागवत यांचा होणार जीवनगौरव 

कोल्हापूर : टाऊन हॉलच्या हिरव्यागार कॅनव्हासच्या साक्षीने प्रत्येक वर्षी रंगणारी "मैफल रंग-सुरांची' यंदा ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत ही छोटेखानी मैफल रविवारी (ता. 17) एका सभागृहात रंगणार आहे. कला रसिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याचा अनुभव घेता येणार आहे. रंगबहार संस्थेतर्फे सलग 43 व्या वर्षी हा उपक्रम होणार आहे. दरम्यान, कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर, विश्‍वरंग विश्‍वनाथ नागेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात घेतला जातो. 

यंदाच्या मैफलीत मधुसुदन शिखरे यांचे गायन होणार असून ज्येष्ठ चित्रकार व माजी प्राचार्य जी. एस. माजगावकर, ज्येष्ठ चित्रकर्ती, माजी प्राचार्या श्रीमती अस्मिता जगताप, शिल्पकार संजीव संकपाळ यांचा कलाविष्कार असेल. यंदाचा रंगबहार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकर्ती व कलाशिक्षिका डॉ. नलिनी भागवत यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत हा उपक्रम होणार असून रंगबहार संस्थेच्या फेसबुक पेजवरून त्याचे थेट प्रसारण होणार आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mafal Rang-Suranchi event online this year