'ढिगाऱ्यातून एक पाय हालताना दिसला अन्‌...' व्हाईट आर्मीच्या जवानाने सांगितला थरारक अनुभव

लुमाकांत नलवडे
Wednesday, 26 August 2020

आम्ही तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होतो. यावेळी शेजारीच लहान मुलाचा एक पाय हालताना दिसला आणि आम्ही शोध मोहिम तेथेच थांबवली. क्षणभर काहीच कळाले नाही. 

कोल्हापूर  ः कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात एक एक अडथळे दूर करीत आम्ही पुढे पुढे जात होतो. एका महिलेचा हात आम्हाला लागला. आम्ही तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होतो. यावेळी शेजारीच लहान मुलाचा एक पाय हालताना दिसला आणि आम्ही शोध मोहिम तेथेच थांबवली. क्षणभर काहीच कळाले नाही. क्षणात सावरून त्याच्याकडे वळलो. तो जीवंत असल्याचे समजल्यानंतर त्याला काढण्यासाठी आमची धडपड सुरू झाली आणि सुमारे वीस-पंचवीस मिनिटांच्या शर्तीच्या प्रयत्नाने चार वर्षाचा महमद बागीला ढिगाऱ्यांतून सुखरुप बाहेर काढले. कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचा जवान विनायक भाट सांगत होता. 

महाडमधील काजळपुरा (जि.रायगड) येथे पाच मजली इमारत जमीनदोस्त झाली. त्यामध्ये अडकलेल्या चार वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात कोल्हापूरच्या जवानाने मोलाचा वाटा उचलला. थेट ग्राउंड रिपोर्टवरून भाटने दिलेली माहिती नक्कीच सुन्न करणारी आणि कोल्हापूरच्या माणुसकीची शान वाढविणारी होती. 

व्हाईट आर्मीची दुसरी टीम सकाळी सातच्या सुमारास महाड येथे पोचली. विनायक भाट याने मदत कार्यात भाग घेतला. पुढे तो सांगत होता. आठच्या सुमारास मदतकार्यासाठी थेट ढिगाऱ्यावर चढलो. सोबत सुमीत साबळे होता. छोटे-मोठे ढिगाऱ्याचे अडथळे बाजूला करून पुढे जात होतो. आवश्‍यक तेथे खोदाई यंत्राची (जेसीबी) मदत घेत होतो. तेंव्हा समोर महिलेचा हात दिसला. घराच्या दरवाजाजवळ होता. बहुतेक ती घरातून बाहेर पडण्याच्या प्रयत्न होती. तिचा मृतदहे बाहेर काढत असतानाच साधारण पाच-सात फुटांच्या अंतरावर मुलाचा पाय हालताना दिसला. क्षणभर काहीच कळाले नाही. तो मुलगा जीवंत असल्याचे दिसल्यामुळे आम्ही क्षणात मदत कार्य थांबवले. स्वतःला सावरत मुलाकडे पाहिले तेंव्हा तो रडू लागला. आम्ही त्याला धीर दिला. त्याच्या आजूबाजूचे अडथळे दूर केले. मात्र त्याच्या एका गुडघ्यावर दरवाजाची चौकट पडल्यामुळे त्याला पुढे येता येत नव्हते. तो पाय आणि हात हलवून वाचण्याचा प्रयत्न करीत होता. इमारतीच्या ढिगाऱ्यात त्याचा जीव गुदमरला होता. आम्ही महिलेच्या मृतदेहाकडून थेट मुलाला वाचविण्याकडे लक्ष दिले. सुमारे वीस-पंचवीस मिनिटांच्या प्रयत्नांत इतरांच्याही सहकार्याने आम्ही त्याला ढीगाऱ्यातून बाहेर काढले. गर्दीतून वाट काढत सुमीत साबळेने त्याला रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल केले. 

जीन्यात अनेकजण अडकले 
मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा मदत कार्यालयाला सुरवात केली. तेंव्हा अनेक महिला,पुरुष आणि इमारतीतील व्यक्तींचे मृतदेह जीन्यातच आढळून आले. त्यामुळे इमारत कोसळत असल्याचा अंदाज आल्यामुळे अनेक जण बाहेर पडत असताना ढिगाऱ्याखाली सापल्याचे दिसून आल्याचेही जवान विनायक भाट सांगत होता. 

नोकरी करत मदतकार्य 
22 वर्षाचा विनायक भाट कसबा बावड्यात राहतो. मार्केटींगची नोकरी करतो. सहावर्षाच्या अनुभवात त्याने 2014 मध्ये नेपाळ, 2016ला महाड पुल दुर्घटना, केरळ मधील महापूर आणि नाशिक,जळगाव येथील संकट काळातही केलेले धाडस आणि त्याचा अनुभव आणि अशोक रोकडे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरल्याचेही विनायक भाटने सांगितले 
 

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahad building collapse white army jawan share experience of resque operation