esakal | इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra cricket team captain and Senior former Test cricketer S. R. Patil expired today morning in kolhapur

इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता.

इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय 87, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती. पाटील मूळचे कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील रहिवासी. त्यांचा 10 ऑक्‍टोबर 1933ला जन्म झाला. 

वडील रावजी पाटील यांना मुलाने क्रिकेटमध्ये कोल्हापूरचे नाव उचंवावे, अशी इच्छा होती. पाटील यांनी वडिलांच्या इच्छेसाठी क्रिकेटचा कसून सराव केला. त्यांचे न्यू हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले. ते इंग्लंडमधील लंकेशायर, नॉर्थस्टॅण्पोर्डशायर व नॅन्टविच क्‍लबकडून खेळले. क्‍लबकडून खेळताना त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीची आकडेवारी थक्क करणारी ठरली. इंग्लंडमधील माध्यमांनी त्याची दखल घेत त्याला प्रसिद्धी दिली. इंग्लंडमध्ये त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. तसेच उत्कृष्ट व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली. 

न्यूझीलंडविरूद्धच्या एकमेव कसोटीत त्यांची निवड झाली होती. कर्णधार पॉली उम्रीगर यांच्या नेतृत्त्वाखाली ही कसोटी भारतीय संघाने जिंकली. प्रथम श्रेणीच्या सामन्यातही त्यांनी अष्टपैलू खेळ केला. ते 1952 ते 1964 दरम्यान महाराष्ट्र संघाकडून खेळले. त्यात त्यांनी 36 सामन्यात तीन अर्धशतकांसह 866 धावा केल्या. गोलंदाजीत 30.66 सरासरीने 83 गडी बाद करत वेगळा ठसा उमटवला. प्रथम श्रेणीत 38 धावांत पाच गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 


पाटील जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये 36 वर्षे कार्यरत होते. जे. आर. डी. टाटा यांचा त्यांच्या गोलंदाजीवर जबरदस्त आत्मविश्‍वास होता. त्यांना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे प्रोत्साहन, तर जतचे राजे डफळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. क्रिकेट वर्तुळात डी. आर पाटील, एम. आर. पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांचे हे बंधू होत. 

संपादन - स्नेहल कदम